वणीतील रोजंदारी मजुरांसाठी बसण्याची सोय करा, मनसेची मागणी
मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांची मजुरांना घेऊन पालिकेत धडक
बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील शिवनेरी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या बाजूला रोजंदारीवर काम करणा-या शेकडो मजुरांचा ठिय्या असतो. मात्र येथे मजुरांना बसण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांना योग्य ती बसण्याची सोय करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) वणी शहरतर्फे करण्यात आली आहे. शहराध्यक्ष अंकुश बोढे यांच्या नेतृत्वात याबाबत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
शहरातील शिवनेरी चौकात दररोज अनेक मजूर कामाच्या शोधात येतात. हे मजूर बांधकाम, शेती आणि घरगुती कामे करून वणीकरांना हातभार लावतात. मात्र, त्यांच्यासाठी बसण्याची कोणतीही सोय नसल्याने उन्हात आणि सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मजुरांना पावसात उभे राहावे लागते. त्यामुळे त्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सदर बाब मजुरांनी मनसेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांना सांगितला. अंकुश बोढे यांनी मजुरांशी चर्चा केली. त्यांनी मजुरांसह पालिकेत धडक दिली. मजुरांसाठी उद्यानाच्या बाजूला सिमेंटचे बेंच किंवा योग्य ती बसण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी मनसेचे कृष्णा निमसटकर, शंकर पिंपळकर, योगेश ताडम यांच्यासह गजानन कवडे, बजरंग वाघदरकर, गजू भागले, विजय भागले, दीपक गाढईकर, मोहन वाईकर, नीलेश ताजणे, भाऊराव नवले, अजय तिराणकर यांच्यासह अनेक मजूर उपस्थित होते.



Comments are closed.