रंगारीपुरा येथील नदीजवळील परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात
मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांच्या पाठपुराव्याला यश, स्थानिकांनी मानले आभार
बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील वार्ड क्रमांक 19 आणि 21 मधील रंगारीपुरा भागातील नदीजवळील परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होती. ठिकठिकाणी झाडं झुडपं वाढले होते. तसेच नदीकाठी एक मंदिर देखील आहे. कचरा वाढल्याने मंदिरात जाण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत स्थानिकांनी मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांच्या पर्यंत ही बाब पोहचवली. बोढे यांनी नगर परिषदेकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, पालिकेतर्फे आता या भागातील साफसफाईला सुरुवात झाली आहे.
रंगारीपुरा येथील महाकाली मंदिर ते नदी काठ या रस्त्याची अवस्था गेल्या 20-22 वर्षांपासून दयनीय झाली आहे. सुमारे दोन दशकांपूर्वी बांधलेला हा सिमेंट रोड नळ कनेक्शनसाठी वारंवार खोदला गेला. त्यामुळे हा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे, यामुळे नागरिकांना येण्या-जाण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय, परिसरात मोठी झुडपे वाढल्याने साप, विंचू आणि इतर विषारी प्राण्यांचा धोका वाढला आहे. तसेच, बाजूच्या गटारामुळे दुर्गंधी आणि आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अनेकदा निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष झाल्याने हा भाग विकासापासून वंचित राहिला होता.
मनसेचा पुढाकार स्थानिक रहिवाशांनी आपली व्यथा मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांच्याकडे मांडली. बोढे यांनी हे प्रकरण तातडीने मुख्याधिकारी सचिन गाडे यांच्या निदर्शनास आणून दिले. नुकतीच झालेल्या भेटीत बोढे यांनी रस्त्याची दुरवस्था आणि नागरिकांची गैरसोय याबाबत सविस्तर माहिती दिली. या प्रश्नाचा पाठपुरावा केला. अखेर पालिकेने या समस्येकडे लक्ष देऊन तात्काळ स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यावरील झुडपे, घनकचरा आणि गटाराच्या पाण्याचा निचरा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या बांधकामासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. या निर्णयामुळे रंगारीपुरा येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर मनसेच्या प्रयत्नांचे कौतुक केले जात आहे. या प्रसंगी मनसेचे शंकर पिंपळकर, कृष्णा निमसटकर, योगेश ताडम यांच्यासह स्थानिक पवन पाल, संयम ठाकरे, प्रवीण बोत्रा, राहुल पिसे, आरती उत्तरवार, माधुरी कोत्तलवार यांच्यासह मनसे पदाधिकारी आणि स्थानिक महिला-पुरुष उपस्थित होते.



Comments are closed.