मनसेच्या इशाऱ्यानंतर वणीतील ‘VIP’ रस्त्याच्या दुरुस्तीला गती

मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी दिला होता इशारा

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील एकता नगर ते तहसील कार्यालय मार्गाची दुरवस्था आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे अखेर प्रशासनाचे लक्ष गेले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘मनसे स्टाईल’ आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर नगर परिषदेकडून या ‘VIP’ रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. याबाबत मनसेचे अंकुश बोढे यांनी निवेदन देत रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. तसेच रस्ता न झाल्यास गंभीर इशारा देखील दिला होता. मात्र आता रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावर मोठे खड्डे आणि पावसामुळे साचलेले पाणी अपघातांना कारणीभूत ठरत होते. तहसील कार्यालय, बस स्थानक आणि यवतमाळ मार्गाशी जोडणारा हा शॉर्टकट असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. या मार्गावर न्यायाधीश आणि उपविभागीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने असल्यामुळे रस्त्याची दुरुस्ती अत्यावश्यक होती. मनसेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली होती. कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

 

 

रस्त्यावर खड्डे असल्याने पाऊस येताच रस्त्यावर पाणी साचायचे

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

बोडे यांनी निवेदनाची प्रत उपविभागीय अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागालाही पाठवली होती. मनसेच्या ठाम भूमिकेनंतर प्रशासनाने नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन रस्त्याचे काम सुरू केले आहे. सध्या सुरू असलेल्या कामामुळे प्रशासनाने ही मागणी गांभीर्याने घेतल्याचे स्पष्ट होत असून, नागरिकांना दिलासा मिळाला आहे. लवकरच हा मार्ग सुस्थितीत येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.