विद्यार्थ्यांच्या हाती जणू हरवलेला ‘जादुई चिरागच’ लागला….

दोन विद्यार्थ्यांचे चोरी गेलेले मोबाईल पोलिसांनी १ तासातच मिळवून दिले

बहुगुणी डेस्क, वणी: स्मार्टफोन आज जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. विद्यार्थ्यांसाठी तर तो ‘जादुई चिरागच’ आहे. अभ्यासापासून अनेक महत्त्वाचे फॉर्म भरण्यापर्यंतची विविध कामे यावर विद्यार्थी करतात. जर हा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर विद्यार्थ्यांवर संकटच कोसळते. मात्र वणी पोलिसांच्या सतर्कतेने त्यांचा हा ‘जादुई चिराग’ केवळ एका तासाच्या आतच परत मिळाला. दोन्ही विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास घेत वणी पोलिसांचे आभार मानलेत.

शुक्रवारी आकाश विशाल भोयर (21) आणि अजून एक विद्यार्थी गावाला जाण्यासाठी बसमध्ये चढत होते. दरम्यान कोणत्यातरी अज्ञात चोरट्याने या गडबडीत यांचे दोन मोबाईल चोरलेत. ही गोष्ट लक्षात येताच दोघांच्याही काळजात धस्स झालं. त्यांना कुठलातरी महत्त्वाचा फॉर्म भरायचा होता. आता पुढे काय असे प्रश्नचिन्ह दोघांच्याही डोळ्यांसमोर उभे राहिले.

मग त्यांनी तत्काळ वणी पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी घटना नीट समजून घेतली. नंतर पोलीस हेडकॉन्स्टेबल पाटील आणि त्यांचे रायटर ललित नवघरे तत्काळ घटनास्थळी म्हणजे बस स्टॅंडवर गेलेत. हाती काही सुगावा लागतो काय याचा शोध घेऊ लागलेत. गोपनीय सूत्रांकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली. अवघ्या एका तासात विद्यार्थ्यांना त्यांचे मोबाईल परत मिळाले.

विद्यार्थी महत्वाचा फॉर्म भरण्याच्या गडबडीत असल्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार न करावयाची विनंती केली. विद्यार्थ्यांना त्यांचे मोबाईल पोलिसांनी परत दिलेत. तेव्हा विद्यार्थ्यांच्या जीवात जीव आला. पोलिसांच्या या ऍक्शन मोडमुळे विद्यार्थ्यांचा पोलिसांवरती असलेला विश्वास अधिक दृढ झाला. ही कारवाई पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात पो.हे. कॉं. पाटील, पो. कॉं. ललित नवघरे यांनी केली. वणी पोलिसांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.