डॉ. शिरिष ठाकरे यांना 35 लाखांच्या खंडणीची मागणी

कुख्यात दिवटे गँगच्या सहा जणांना वणीत अटक

0

विवेक तोटेवार, वणी: वणीतील सुप्रसिद्ध डॉक्टर शिरिष ठाकरे यांना 35 लाखांच्या खंडणीची मागणी व जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी यवतमाळ येथील कुख्यात दिवटे गँगच्या सहा साथिदारांना अटक करण्यात आली. यात प्रवीण दिवटे याची मुलगी सृष्टी दिवटे हिचाही समावेश आहे.

सविस्तर वृत्त असे की फिर्यायी डॉ. शिरीष रघुनाथ ठाकरे (58) राहणार वणी यांच्याकडे काही दिवसांआधी एक शेखार इसम आला होता. त्याने त्याच्या मुलाची एमबीबीएसला ऍडमिशन करण्यासंबंधी विचारणा केली होती. तसेच नागपूर येथील कुणीतरी भोयर नावाचा इसम आहे जो ऍडमिशनचे काम बघतो. त्यांच्याशी काही ओळख असल्यास मुलाच्या ऍडमिशनचे काही तरी बघा व्यवहाराचे मी बघतो असा प्रस्ताव ठेवून निघून गेला.

3 सप्टेंबर सोमवारी संध्याकाळी साडे सहा वाजताच्या दरम्यान एक टाटा सफारी गाडी (MH 29- AD 4781) डॉ. ठाकरे यांच्या विराणी टॉकिज परिसरात असलेल्या दवाखान्यासमोर येऊन थांबली. गाडीतून सृष्टी दिवटे व तिचे पाच साथिदार उतरले. सृष्टी दिवटे ही दिवंगत कुख्यात प्रवीण दिवटे याची मुलगी आहे.

सृष्टी आपल्या साथिदारांसह ठाकरे यांना भेटली व शेखारच्या मुलाच्या ऍडमिशनचे काम माझ्याकडे आहे. त्याने दिलेले 35 लाख रुपये परत करण्याची मागणी केली. सोबतच मी गँगस्टर प्रवीण दिवटे यांची मुलगी असल्याचे सांगून धमकावण्याचा प्रयत्न करत लाखांच्या खंडणीची मागणी केली. जर पैसे दिले नाही तर त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारने भयभीत होऊन ठाकरे यांनी ही माहिती लगेच पोलिसांना दिली.

पोलिसांनी लगेच घटनास्थळी पोहोचून दिवटे गँगच्या लोकांना अटक केली. याआधीही पाच महिन्यांअगोदर डॉ. ठाकरे यांच्याकडे दिवटे गँगचे पंटर आले होते. तेव्हाही त्यांनी 35 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. परंतु भीतीपोटी ठाकरे यांनी पोलिसांत तक्रार दिली नव्हती.

मात्र यावेळी त्यांच्या मुलीचे देखील बरेवाईट करणार अशी धमकी दिल्याने त्यांनी भयभीत होऊन पोलिसांत तक्रार दिली. सध्या पोलिसांनी सृष्टी प्रवीण दिवटे (27) हिच्यासह सुमीत खांदवे (23) रा. यवतमाळ, समीर ठाकूर (20), शाहरुख अली किस्मत अली, रा. यवतमाळ, विश्वास निकम (25) रा. घाटंजी, सूरज आळे (20) रा, यवतमाळ या पाच साथिदारांना अटक करत संबंधीत गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन जप्त केले आहे. त्यांच्यावर खंडणी व जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी भांदवि कलम 143, 387 व 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय विजय गराड करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.