सराफा व्यापा-याला गंडवणा-या वणीतील मिस्टर नटवरलालला अटक

नागपूर येथे अटक, अनेक सराफा व्यापा-यांना गंडवल्याचे समोर

0

जब्बार चीनी, वणी: गेल्या काही महिन्यांपासून एका गंभीर गुन्ह्यात फरार असलेला व नागपूर येथे एका सराफा व्यापा-याला गंडवणा-या वणीच्या आशुतोष महाजन या भामट्याच्या नागपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. एका व्यापा-याकडून सोन्याची नाणी विकत घेऊन त्याची फसवणूक केल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. याच पद्धतीने या नटवरलालने अनेक व्यापा-यांना गंडवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

नागपूर येथील इतवारा बाजारात उत्तम गुलाबचंद कश्यप यांचे सराफा (ज्वेलरी) दुकान आहे. दिनाक 9 जुलै रोजी रात्री 7 वाजता दुकान बंद करण्याच्या सुमारास हा नटवरलाल दुकानात गेला. तिथे त्याने आपण डॉक्टर असल्याची बतावणी करत मी आपला जुना ग्राहक असून माझ्या घरी पूजा सुरू आहे. त्यासाठी एक 10 ग्रॅमचे व 5 ग्रॅमचे सोन्याची नाणी हवे असल्याचे त्याने सांगितले. मात्र दुकान बंद करण्याची वेळ झाली असल्याने कश्यप यांनी नाणी देण्यास नकार दिला. त्यावर धार्मिक विधी असल्याने खूपच गरजेचे असल्याचे त्याने सांगितले. यावर दुकानदाराने नाणी देण्याचे मान्य केले.

त्या दोन्ही नाण्याचे बिल 78,414 रुपये झाले. जेव्हा दुकानदाराने बिलाची रक्कम मागितली असता महाजनने पूजेच्या गडबडीमुळे रक्कम आणता आली नाही. त्यामुळे तुम्ही चेक घ्या अशी गळ घातली. दुकानदाराने चेक स्वीकारला. मात्र तो चेक जेव्हा त्यांनी बँकेत टाकला, तेव्हा तो काही वटलाच नाही.  यावर आरोपीच्या मोबाईल क्रमांकावर दुकानदाराने संपर्क केला असता त्यावरही त्याने प्रतिसाद दिला नाही. अखेर सराफा व्यावसायिक कश्यप यांनी पोलीस स्टेशन गाठले.

प्रातिनिधिक फोटो

तहसिल पोलीस ठाण्याचे ठाणेदार जयेश भंडारकर यांच्या मार्गदर्शनात पोलिसांची टीम चौकशी करण्यासाठी महाजनच्या घरी गेली व त्याला अटक केली. त्याला अटक झाल्याचे कळताच शहरातील इतर सराफा व्यापा-यांनीही पोलीस स्टेशन गाठत त्यांनाही या नटवरलालने लाखोंचा गंडा घातल्याची तक्रार दिली. सध्या तहसिल पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याने आणखी किती व्यापा-यांना गंडवले याची माहिती काढत आहेत.

मिस्टर नटवरलालवर वणीतही गुन्हा दाखल
आशुतोष महाजन हा स्वत:ची डॉक्टर असल्याची ओळख द्यायचा. त्यामुळे व्यावसायिक त्याच्यावर चटकन विश्वास ठेवायचे. त्यानंतर दुकानदाराचा विश्वास संपादन केल्यावर चेक देऊन खरेदी करायचा. मात्र चेक न वटल्यावर त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात यायचे. पोलिसांनी माहिती काढली असता तो बोगस डॉक्टर असल्याचे समोर आले आहे. शिवाय त्याच्यावर वणीत बलात्काराचा गुन्हा दाखल असून त्या प्रकरणात तो फरार असल्याचेही समोर आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.