प्रभाग 11 मध्ये रंगणार ‘हाय व्होल्टेज’ निवडणूक !
प्रमुख पक्षांचे पदाधिकारी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्ह...
बहुगुणी डेस्क, वणी: नगरपरिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागताच वणी नगरपालिकेचे राजकारण चांगलेच तापले आहे. नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित महिला पदाचे आरक्षण जाहीर झाल्याने बड्या नेत्यांचा हिरमोड झाला असला तरी, पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी नगरसेवक, उपाध्यक्ष किंवा सभापती पदाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. त्यामुळे विविध पक्षांनी आपले प्रमुख मोहरे रणांगणात उतरवण्याचा निर्धार केला असून, प्रभाग क्रमांक 11 ची निवडणूक सध्या ‘हाय व्होल्टेज’ चर्चेचा विषय ठरत आहे.
या प्रभागात सर्वसाधारण पुरुष आणि अनुसूचित जमाती महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे. विशेष म्हणजे, या प्रभागात प्रमुख पक्षांचे पदाधिकारीच उमेदवार असणार असल्याने ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे. भाजपकडून व्यापारी आघाडीचे पदाधिकारी उमेदवारीसाठी चर्चेत असून, अन्य दोन व्यापारी पदाधिकारी आणि एक सक्रिय महिला देखील शर्यतीत आहेत. शिंदे गटाकडून शहरातील एका पदाधिका-याला उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मनसेचे शहराध्यक्ष याच प्रभागातून उमेदवारी दाखल करणार असल्याचे निश्चित झाले आहे. काँग्रेस पक्षाने तुलनेने नवख्या उमेदवाराला रणांगणात उतरवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.
यासह इतर पक्षाचे पदाधिकारी देखील इच्छुक असल्याचे कळतये. तसेच ज्या इच्छुकांना पक्षाची तिकीट मिळणार नाही. त्या इच्छुकांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप पक्षातर्फे कुणालाही उमेदवारी जाहीर झाली नसली तरी प्रभाग क्रमांक 11 मध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ नगरसेवकाची नसून, पक्षांच्या स्थानिक नेतृत्वाची खरी कसोटी ठरणार आहे. प्रत्येक पक्षाने विजयासाठी जोर लावला असून, निवडणुकीच्या दिवसांपर्यंत येथील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.



Comments are closed.