छत्रपती संभाजी राजे एकमेकाद्वितीय लढवय्ये- तेजस्विनी गव्हाणे

'माझा गाव - माझा वक्ता' अंतर्गत उभा केला जाज्वल्य जीवनपट

पुरुषोत्तम नवघरे, वणी: छत्रपती संभाजी राजे एकमेकाद्वितीय लढवय्ये होते. विश्वाच्या इतिहासात असा प्रज्ञावंत, लढवय्या, कुशल नेता होणे नाही. केवळ 32 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. त्यातही त्यांनी 16 भाषांवर प्रभुत्व मिळवलं. आपल्या राजकीय कारकीर्दीत 120 युद्ध ते लढलेत. किंबहुना सर्व युद्धं ते जिंकलेत. औरंगजेबासारख्या शत्रूच्या ताब्यात 40 दिवसांच्या प्रचंड यातना त्यांनी सोसल्यात.

तरीही मुघलांच्या मागणीला भीक न घालता शेवटच्या श्वासापर्यंत ते झुंजलेत. कणभरही ते झुकले नाहीत. छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या समाजासाठी एक आदर्श महापुरुष होते. असे प्रतिपादन अकराव्या वर्गातली विद्यार्थिनी तेजस्विनी गव्हाणे हिने केले. ती विदर्भ साहित्य संघ व नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने चालविल्या जात असलेल्या ‘माझा गाव – माझा वक्ता’ या व्याख्यानमालेचे 42 वे पुष्प गुंफतांना बोलत होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघ वणी शाखेचे कार्यक्रम प्रमुख राजाभाऊ पाथ्रडकर हे होते. अतिथी म्हणून नगर वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्नेहलता चुंबळे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानावर आधारित ‘देव, देश अन् धर्मासाठी तुम्ही दिले प्राण, विसरू कसे बलिदान’ हे गीत सादर केले. त्यानंतर वि. दा. सावरकर रचित ‘सागरा प्राण तळमळला’ हे गीत विजय गंधेवार यांनी गायले.

आपला विषय पुढे मांडताना तेजस्विनी म्हणाली की, दोन-अडीच वर्षांचे वय असताना संभाजी महाराजांवरील मातृछत्र हरवले. माँ जिजाऊंच्या संस्कारात वाढलेल्या छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी ‘बुधभूषणम’ हा संस्कृत भाषेतील ग्रंथ लिहिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्वाणानंतर त्यांचा राज्याभिषेक झाला. परंतु त्यांना त्यांच्या जीवनात बाह्यशत्रूंबरोबरच अंतर्गत शत्रूशीहीं सामना करावा लागला.

स्वराज्यावर प्रचंड सैन्य घेऊन चाल करून आलेल्या औरंगजेबाला रणांगणावर जेरीस आणले. त्या छत्रपती संभाजी महाराजांना आप्तस्वकियांनीच गद्दारी करून पकडून दिले. 40 दिवसांच्या हालअपेष्टा त्यांनी सहन केल्यात. मात्र महाराजांनी आपला धर्म सोडला नाही. धर्म, देश आणि आपल्या स्वराज्यासाठी संभाजी महाराजांनी बलिदान दिले.

अध्यक्षीय भाषणातून राजाभाऊ पाथ्रडकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील लढाऊ वृत्ती व बाणेदारपणा यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधवराव सरपटवार यांनी केले. सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघ स्थानिक शाखेचे सचिव प्रा. डॉ. अभिजित अणे यांनी केले. आभार प्रदर्शन उपाध्यक्ष मुख्याध्यापक गजानन कासावार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार, सुनीता राठोड यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.