मारेगाव नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला, डॉ. मनिष मस्की नगराध्यपदी….

राजकीय उलथापालथ... मारेगाव नगरपंचायतीमध्ये सेना भाजप युती.... शिवसेनेची काँग्रेसला धोबीपछाड, अधिक जागा मिळूनही काँग्रेस सत्तेबाहेर

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता येण्याची फक्त औपचारिका बाकी असताना शिवसेनेने काँग्रेसला धोबिपछाड देत मारेगाव नगर पंचायतीवर भगवा फडकवला आहे. शिवसेनेचे डॉ. मनिष तुळशीराम मस्की हे मारेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. 8 विरुद्ध 7 मतांनी शिवसेनेने काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार नंदेश्वर आसुटकर यांचा पराभव केला. विशेष म्हणजे शिवसेनेने भाजपसोबत हातमिळवणी करीत हा विजय मिळवला आहे. तर काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी मतदानास अनुपस्थित राहून सेनेला मदत केली आहे. तर दुसरीकडे मारेगावसह झरी नगरपंचायतीमध्ये भगवा फडकल्याने माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या मुसद्दी राजकारणाचा हा विजय मानला जात आहे. तर दोन्ही नगरपंचायतील हाती आलेली सत्ता गेल्याने काँग्रेसचा हा मोठा पराभव मानला जात आहे. 

मारेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत 17 पैकी 5 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. तर शिवसेना 4 जागा व भाजप 4 जागा जिंकत दुस-या क्रमांकावर होते. मनसे 2 व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 1 जागा जिंकली तर एक अपक्ष नगरसेवक निवडून आला. सर्वाधिक जागा जिंकल्याने काँग्रेसचा नगराध्यक्ष बनणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

राज्यात नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला होता. मात्र झरी नगरपंचायतीमध्ये सेनेने काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जंगम दलासोबत युती केली. त्याचे पडसाद मारेगाव येथे पडले. त्यामुळे काँग्रेस आणि सेनेमध्ये नगराध्यक्ष पदावरून धुसफुस सुरू होती. झरीचा वचपा मारेगावात काढत काँग्रेसने मनसेचे दोन नगरसेवक, एक अपक्ष व राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाची मदत घेतली.

पक्षाच्या नगरसेवकांची नाराजी काँग्रेसला भोवली !
काँग्रेसने नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. यामुळे काँग्रेसचे नगरसेवकांमध्ये नाराजी होती. निवडून आल्यानंतरही नगराध्यक्ष पदी अपक्ष येणार असल्याने काहींचे नगराध्यक्षपदांचे स्वप्न भंगले. त्यामुळे काँग्रेसचे आकाश बदकी व थारांगणा खालिद महंमद या दोन नगरसेवकांनी बंडखोरी करीत मतदानाला अनुपस्थिती दर्शवली व सेनेचा नगराध्यक्ष पदाचा मार्ग मोकळा केला.

बंडखोरी करणा-यांवर अपात्रतेची कारवाई करणार – वामनराव कासावार
नगराध्यक्ष पदाच्या मतदानासाठी नगरसेवकांना व्हीप बजावण्यात आला होता. मात्र दोन नगरसेवकांनी वेळेत हजर न राहता पक्षाचा व्हीप झुगारला. त्यामुळे पक्षविरोधी कारवाईंचा केल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाणार आहे.
– वामनराव कासावार, माजी आमदार व ज्येष्ठ काँग्रेस नेते 

शिवसेनेच्या या अभूतपूर्व विजयामुळे शिवसैनिकांनी मारेगाव येथील पक्ष कार्यालयात एकच गर्दी केली होती. त्यांनी गुलाल उधळून व फटाक्याची आतषबाजी करीत एकच जल्लोष केला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, संजय देरकर, सुनिल कातकडे, संजय निखाडे, संजय आवारी, अभय चौधरी यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

अपक्षाला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार केल्याने काँग्रेसमध्ये नाराजी होती. त्यामुळे ‘वणी बहुगुणी’ने पक्षामध्ये बंडखोरीची शक्यता वर्तवली होती. अखेर ही शक्यता खरी ठरली. नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. मनिष तुळशीराम मस्की यांनी अवघ्या चार मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता. ते प्रभाग क्रमांक 9 मधून निवडून आले होते.

(नवीन माहिती येताच ही बातमी अपडेट केल्या जाईल.)

हे देखील वाचा: 

झरी नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा… ज्योती बीजगूनवार नगराध्यक्ष

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.