देशमुखवाडीत रंगला नकलांचा कार्यक्रम, नकलाकारांचा सत्कार

नकला समाज प्रबोधनाचे सशक्त माध्यम - डॉ. दिलीप अलोणे

विवेक तोटेवार, वणी: नकला हे लोक रंजनासोबत समाज प्रबोधन करण्याचे सशक्त माध्यम आहे. नकलाकारांनी जाऊन आपल्या कलेची साधना करीत लोकांना पोट धरून हसवले. कष्टकऱ्यांच्या दुःखाला क्षणभर का होईना रिजवण्याचे काम केले. ही कला जिवंत ठेवण्यासाठी या कलावंतांचा सन्मान होणे ही गौरवाची बाब आहे, असे मत ज्येष्ठ लोककलावंत डॉक्टर दिलीप अलोणे यांनी व्यक्त केले. वणी येथील देशमुख वाडीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने नकला कलावंतांचा गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर अध्यक्ष हर्षल वडे, सचिव वैभव ताटकोंडावार ,डॉक्टर अनिकेत अलोणे उपस्थित होते . यावेळी नकलाकार दिगंबर गाडगे व राम झिले या नकलाकारांचा मंडळाच्या वतीने शाल ,श्रीफळ व गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सत्कारानंतर दिगंबर गाडगे यांनी अडाणी बाई, लगीन घाई , एक मूल सुगंधी फूल या तर राम झिले यांनी माव लगन कवा होनार या नकला अतिशय प्रभावीपणे सादर करून उपस्थितांना मनमुराद हसविले व दाद घेतली.

समाज माध्यमांमुळे आणि घराघरात पोहोचलेल्या सांस्कृतिक आक्रमणामुळे समाजाची अभिरुची बदलत आहे त्यामुळे पारंपारिक व पिढी जात असलेल्या सशक्त लोककलांचा ऱ्हास होतो की काय अशी भीती व्यक्त करीत डॉक्टर दिलीप अलोणे यांनी या लोककलांच्या संवर्धनासाठी आज लोकाश्रया बरोबर राजाश्रयाची अधिक गरज आहे असे म्हणत मंडळाच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

डॉ. ऐश्वर्या अनिकेत अलोणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पवन बोधनकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रथम महाकुलकर, संकेत दानव, संदीप ठोंबरे, केतन लाभे, प्रज्योत धांडे, अक्षय परांडे व मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

स्वातंत्र्यपूर्वकाळापासून किर्तन बहुरूपी या परंपरेला समांतर लोकरंजनासाठी नकला या लोककलेच्या उगम झाला. या स्वयंभू कलेने प्रचंड लोकप्रियता मिळविली आणि सर्व दूर त्याचा प्रसार झाला. या कलेसाठी वैदर्भीय नकलाकारांनी फार मोठे योगदान दिले आहे. 1992 मध्ये वणी येथे महाराष्ट्रातील सर्व नकलाकारांच्या नकला महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

Comments are closed.