बिल्डरने ले-आऊटसाठी गिळला नैसर्गिक नाला

नियम धाब्यावर बसवल्यावरही प्रशासनाचे दुर्लक्ष का?

विवेक तोटेवार, वणी: शहरालगत असलेल्या ब्राह्मणी फाट्याजवळ नुकतेच एक लेआऊट पाडण्यात आले आहे. या लेआऊटमधून एक नैसर्गिक नाला वाहत होता. मात्र प्लॉट विकण्यास अडचण येऊ नये व आर्थिक नुकसान येऊ नये म्हणून ले आऊट धारकाने चक्क पाईप टाकून नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलला व ही जागा घशात घातली. जागेतून जर नैसर्गिक नाला जात असल्यास त्यापासून काही जागा सोडून प्लॉटिंग करावी लागते. तसेच त्याला परवानगी देखील काही जागा सोडल्यानंतरच मिळते. मात्र नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे हा प्रकार सुरु आहे. मात्र यावर अद्याप प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ब्राह्मणी फाट्याजवळ गाव क्रमांक 337 मधील सर्वे क्रमांक 96/1 मध्ये 1.62 हेक्टर जागेत शैलेश तोटेवार यांचे लेआऊट आहे. या ले-आऊटमधून शिंगाडा तलावाकडून येणारा एक नैसर्गिक नाला जातो. 100 वर्षांपेक्षाही अधिक काळापासून हा नाला असल्याचे बोलले जाते. हा नाला पुढे वर्धा नदीला जाऊन मिळतो.

पाईप टाकून जागा सपाट
पावसाळ्यात पूरस्थिती आल्यास नाल्याकाठावरील घरांना याचा फटका बसू नये म्हणून प्लॉटींग करताना नाल्यापासून काही मीटर जागा सोडावी लागते. नाल्याकाठची जागा सोडल्यास लेआउटची जागा कमी होते. त्यामुळे बिल्डरने यावर शक्कल लढवून नाल्याच्या ठिकाणी पाईप टाकून जागा सपाट करण्याचा प्रयत्न केला आहे. ले-आउटमधील क्रमांक 8 हा प्लॉट नाल्याची जागा न सोडता जागा सपाट करून पाडण्यात आला आहे.

जागा सपाट करून तयार केलेला प्लॉट

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रशासन, अधिका-यांचे दुर्लक्ष का?
या ले-आउटला आठ महिन्याआधी अटी व शर्तीसह निवासी कार्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र ले-आऊटमध्ये प्लॉटिंग करताना या नाल्याकडे दुर्लक्ष करण्यात आले व संपूर्ण नालाच घशात घालण्याचा प्रकार सुरु आहे. हा प्रकार राजरोसपणे सुरु असूनही अद्याप संबंधीत विभागाचे अधिकारी मात्र याकडे डोळेझाक करताना दिसत आहे. प्रशासन या प्रश्नावर काय भूमिका घेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.