छत्रपतींची आग्रा सुटका नेताजींची प्रेरणा झाली- अंबरीश पुंडलिक

नानासाहेब शेवाळकर स्मृती व्याख्यानात " नेताजी एक क्रांतीपर्व" या विषयावर प्रतिपादन

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: नेताजींनी स्वराज्याचा नवा लढा उभारला. तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता. ते ब्रिटिशांच्या नजरकैदेत होते. याप्रसंगी त्यांनी जी सुटका करून काबूलला रवाना झालेत. यातील नाट्यात्मकता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटकेत कमालीचं साम्य आहे. किंबहुना छत्रपतींच्या आदर्शांवरच त्यांनी स्वातंत्र्याचा लढा लढण्याचा प्रयत्न केला. असे विचार सुप्रसिद्ध युवा विचारवंत अंबरीश पुंडलिक यांनी व्यक्त केले.

शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा आयोजित स्वर्गीय नानासाहेब शेवाळकर स्मृती व्याख्यानाच्या सोळाव्या वर्षीचे पुष्प गुंफताना ते ” नेताजी एक क्रांतीपर्व ” या विषयावर व्यक्त होत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुभाष देशमुख तथा संस्थेचे उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया, सहसचिव अशोक सोनटक्के, संचालक उमापती कुचनकर, अनिल जयस्वाल सुरेश शुक्ल,ओमप्रकाश चचडा, प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे, औषधी शास्त्र निर्माण विभागाचे प्राचार्य सुधाकर रेड्डी हे मान्यवर उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी नानासाहेबांच्या ठिकाणी स्मरण आणि स्फुरण यांचा अद्वितीय संगम होता असे म्हणत श्रोत्यांची निष्ठा वाढवून त्यांच्याच सकारात्मक संदेश प्रसारित करण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन असल्याचे अधोरेखित केले.

जनमानसात राष्ट्रभक्ती, देशप्रेमाची भावना जागृत करण्यात अहिंसावादी आंदोलनाचे खूप मोठे योगदान असले तरी केवळ त्या शांतीच्या मार्गानेच स्वातंत्र्य प्राप्त झाले, हे म्हणणे म्हणजे हजारो क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानाचे अवमूल्यन करणे आहे. भारताबाहेर जाऊन जमवलेल्या ५० हजार सैनिकांना कोणत्याही लाभाशिवाय स्वातंत्र्य आंदोलनाचे योद्ध्ये म्हणून उभे करणे हे सामान्य काम नाही.

त्यातील २५ हजार सैनिकांनी, इंग्रजांनी देखील आपल्या दहा महत्त्वपूर्ण लढायांमध्ये वर्णन केलेल्या इम्फाळ कोहिमाच्या युद्धात बलिदान दिल्यानंतर त्यापासून प्रेरणा घेत इंग्रजांच्या ३५ लाख सैन्यापैकी २५ लाख संख्येत असणाऱ्या भारतीय सैनिकांच्या मनामध्ये जागृत झालेली स्वातंत्र्याची भावना हे इंग्रजांच्या निघून जाण्याचे वास्तविक कारण आहे.

आपल्या अत्यंत मुद्देसूद, अभ्यासपूर्ण आणि प्रभावी शैलीतील विवेचनात अंबरीश पुंडलिक यांनी अन्य सर्व क्रांतिकारकांच्या जीवनात क्रांतीची एखादीच वैशिष्ट्यपूर्ण घटना असते. पण नेताजींचे संपूर्ण आयुष्यच क्रांतिकारक घटनांची एक अखंड शृंखला कशी आहे, हे विविध प्रसंगांच्या आधारे सुस्पष्ट केले.

त्या काळातील सर्वोच्च परीक्षा उत्तीर्ण केल्यावर देखील सहज सुखा समाधानाचे जीवन जगण्याचा पर्याय सोडून मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी केलेले त्यांचे अद्वितीय प्रयत्न, छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेत कलकत्त्यातून केलेला मुक्ती संग्राम, हिटलरच्या माध्यमातून उभी केलेली आझाद हिंद सेना, जर्मनी आणि जपान मध्ये पाणबुडीतून केलेले थरारक देशान्तर, पत्नी एमिली आणि कन्या अनिताचा त्याचा अलौकिक त्याग, नेताजींच्या मृत्यूबाबत असणाऱ्या विविध भूमिका अशा अनेक गोष्टींचा त्यांनी सविस्तर परामर्श घेतला.

हे केवळ व्याख्यान नसून वक्त्यांनी शब्दाच्या माध्यमातून संपूर्ण चलचित्र आमच्यासमोर उभे केले. स्वराज्य केवळ शांतीनेच नव्हे तर क्रांतीने देखील प्राप्त झालेले आहे हे ठसवणाऱ्या अत्यंत सुयोग्य व्यक्तीचे,सुयोग्य विचार ऐकविल्याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया यांनी समाधान व्यक्त केला.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन सहसचिव अशोक सोनटक्के यांनी केले. व्याख्यानपुष्पास वणीतील अनेक गणमान्य नागरिकांसह शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व संस्थांचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

 

Comments are closed.