स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही हटवांजरी (पोड) येथे रस्ता नाही

चिखल तुडवत गावक-यांना करावा लागतो प्रवास

बोटोणी प्रतिनिधी: आपण सध्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. मात्र इतके वर्ष होऊनही हटवांजरी (पोड) येथे अजूनही जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या आठवड्यात एका महिलेला प्रसुतीसाठी मारेगाव येथे येत असताना खराब रस्त्यामुळे त्रास होत असताना काही तरुणांनी मदत केली व मारेगाव येथे सोडले. तर एकदा एका महिलेची दवाखान्यात नेताना बैलगाडीत प्रसुती झाली आहे.

तालुक्यातील हटवांजरी (पोड) ही एक आदिवासी समाजातील लोकांची वस्ती आहे. सुमारे 25 कुटुंबांचे या गावात वास्तव्य आहे. हटवांजरी या गावापासून पूर्वेस दोन किमी अंतरावर हे हटवांजरी हे पोड आहे. पोडापासून 2.5 अंतरावर वणी-यवतमाळ राज्य महामार्ग आहे. या मार्गावरूनच पोडातील नागरीक मारेगावात येतात. मात्र या पोडावरून तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी अजूनही रस्ता बनलेला नाही. त्यामुळे नागरिकांना मोठे हाल सहन करावे लागत आहे.

मारेगाव येथे आठवडी बाजारासाठी लोकांचे नेहमी येणे जाणे सुरू असते. तसेच शिक्षणासाठी, कामासाठी येथील नागरिकांना 2.5 किलोमीटर चिखल तुटवत जावे लागते. गाडी जात नसल्याने आजारी लोकांना चांगल्याच हालअपेष्टा सहन करत मारेगाव येथे पोहोचावे लागते. हटवांजरी (पोड) हे शंभर टक्के आदिवासी वस्ती आहे. या वस्तीकडे लोकप्रतिनिधींसह, प्रशासनानेही कायमच पाठ फिरवली आहे. केवळ मत मागण्याच्या वेळी नेते इथे येतात त्यानंतर ते कधीच इथे येत नाही अशी आपबिती त्यांनी बोलून दाखवली आहे.

एका महिलेची बैलगाडीतच प्रसुती
एक महिला गर्भवती असल्याने गावी माहेरी आली होती. पंधरा दिवसांआधी तिला प्रसुती वेदना होत असल्याने तिला हटवांजरी येथून मारेगाव येथे बैलगाडीत टाकून नेले जात होते. कच्च्या रस्त्यावरील खड्ड्यामुळे ती महिला वेदनेने विव्हळत होती. दरम्यान रोडवरून जाणा-या काही तरुणांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तिला गाडीमध्ये बसवून दवाखान्यात सोडले. जाणाऱ्या काही लोकांना दिसले त्यांनी त्या महिलेला आपल्या गाडीवर बसवून दवाखान्यात सोडले. तर याआधी एका महिलेची बैलगाडीतच प्रसुती झाल्याची धक्कादायक माहिती गावक-यांनी दिली.

रस्त्यासाठी गावक-यांनी 3 सप्टेंबर रोजी नितीन गडकरी यांना निवेदन दिले होते. लवकरात लवकर रस्ता तयार करावा अन्यथा मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा संदीप देवाजी आत्राम, बापूजी कुमरे, राजू बापूराव मेश्राम, दीपक नानाजी आत्राम. रमेश हनगु कुमरे, दादाजी आत्राम, रामू रमेश कुमारे, प्रमोद रामजी मेश्राम, पांडुरंग टेकाम, पांडुरंग गंगाराम आत्राम, रामाजी बापूराव मेश्राम यांच्यासह गावक-यांनी दिला आहे.

हे देखील वाचा:

अखेर राजूर येथील बेपत्ता मुलाचा सापडला मृतदेह

Comments are closed.