ओबीसींची जनगणना करणा-यांनाच मतदान करा, डॉ. लक्ष्मण यादव यांचे आवाहन

वणीत घोंगावले ओबीसींचे वादळ, मोर्चाने दणाणली वणी

बहुगुणी डेस्क, वणी: देशातील 90 टक्के लोक ओबीसी आणि मागासवर्गीय आहेत. या सर्वांना खरोखरच न्याय द्यायचा असेल, तर देशातील ओबीसींसह सर्व जातींची जनगणना होणे गरजेचे आहे, जो पक्ष ओबीसींची जातनिहाय जनगणना करेल त्या पक्षालाच ओबीसींनी मतदान करावे, असे आवाहन प्रख्यात वक्ते व दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. लक्ष्मण यादव यांनी केले. रविवारी दिनांक 11 फेब्रुवारी रोजी वणीत ओबीसींचा एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातील सभेत ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या मोर्चात प्रा. अनिल डहाके, उमेश कोरराम, ऍड. पुरुषोत्तम सातपुते, आशिष साबरे, बाबाराव ढवस, प्रदीप बोनगीरवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

दुपारी 1 वाजता शासकीय मैदानातून एल्गार मोर्चाला सुरुवात झाली. ओबीसींचा हजारोंचा जथ्था या मोर्चात सहभागी झाला होता. एक ओबीसी एक लाख ओबीसी. जो ओबीसी की बात करेगा, वो देश पे राज करेगा. अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. सुरुवातीला शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. मोर्चाने शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण केले. ज्या चौकातून एल्गार मोर्चा गेला त्या प्रत्येक ठिकाणी विविध महापुरुषांना हारार्पण करून मानवंदना देण्यात आली. मोर्चाची सांगता शासकीय मैदान झाली.

मोर्चानंतर सभेला सुरूवात झाली. यावेळी मान्यवरांनी ओबीसींची जनगणना का व्हायला पाहिजे यावर आपले मनोगत व्यक्त केले. मोर्चाला वणी, मारेगाव, झरी, वरोरा, कोरपना इत्यादी तालुक्यातील लोक उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. विशेष म्हणजे मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप बोरकुटे यांनी केले, प्रास्ताविक मोहन हरडे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार रविंद्र आंबटकर यांनी मानले.

विजय चोरडिया यांच्या तर्फे पाणी वाटप
मोर्चात खेड्या पाड्यातील लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते. मोर्चेक-यांना सेवा म्हणून विजय चोरडिया यांनी गांधी चौक व टागोर चौक या ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था केली होती. याशिवाय अनेक सेवाभावी संस्थांनी मोर्चासाठी सेवा दिली होती.

Comments are closed.