पूल झाला पण रस्ता कधी? संजय खाडे यांचा सवाल

रस्ता झाल्यास वणी-भद्रावती अंतर होणार अवघे 20 किमी... बांधकाम न झाल्याने वणी-भद्रावती (जुनाडा) मार्ग बंद...

पुरुषोत्तम नवघरे, वणी: जुनाडा लगत वर्धा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन तीन वर्ष झाले आहे. पूल झाल्याने वणी ते भद्रावती (मार्गे जुनाडा, तेलवासा) हे अंतर अवघे 22 ते 25  किलोमीटरचे होणार आहे. मात्र पुल झाला असला तरी या मार्गाचे अद्याप बांधकाम न झाल्याने हा मार्ग अद्यापही वापरण्याजोगा नाही. त्यामुळे या मार्गाचे तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी उकणीचे माजी सरपंच संजय रामचंद्र खाडे व उकणीच्या माजी संरपंच संगीता संजय खाडे यांनी रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की जुनाडा लगत वर्धा नदीवर करोडो रुपये खर्च करुन पुलाचे बांधकाम करण्यात आले. हे बांधकाम पूर्ण होऊन सुमारे 3 वर्ष लोटली आहे. मात्र रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण झालेले नाही. शिवाय रोड लगतची जमिन संपादित करण्याची प्रक्रिया कासव गतीने सुरु आहे. त्यामुळे पूल होऊन तब्बल 3 वर्ष लोटूनही या पुलाचा कोणत्याही प्रवाशांना फायदा होत नसून हा महत्त्वाचा पूल केवळ शोभेची वास्तू झाला आहे.

वणी ते निळापूर, बोरगाव, जुनाडा, तेलवासा, भद्रावती जाणारा रस्ता तात्काळ पूर्ण झाल्यास वणीहून भद्रावतीचे अंतर 15 ते 20 कि.मी. कमी होईल. त्यामुळे वेळ व पैसा वाचेल. तसेच या पुलाचा वणी व परिसरातील गावक-यांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे या रोडचे तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करावे, या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात तीव्र आंदोलन पुकारले जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनावर संजय खाडे, संगीता खाडे यांच्यासह गावातील सतिश खाडे, राजू धांडे, चेतन शिवरकर, रामचंद्र मत्ते, मनोज खाडे यांच्यासह गावक-यांच्या स्वाक्षरी आहे. निवेदन देते वेळी संजय खाडे, पुरुषोत्तम आवारी, राजाभाऊ पाथ्रडकर, जयसिंग पाटील गोहोकर, प्रमोद वासेकर, सुनील वरारकर, प्रा. शंकर व-हाटे, महेश पावडे, तेजराज बोढे, बंडू मालेकर इत्यादी उपस्थित होते.

Comments are closed.