महाराष्ट्र, भारत आणि देशाबाहेरही युवकांना रोजगाराची संधी- उ.वि.पो.अ. गणेश किंद्रे

उंची व छाती निकषांमध्ये बसले नाही तरीही अन्य संधी, रोजगार मेळाव्यात पो.नि. गोपाल उंबरकर यांचे प्रतिपादन

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: तरुणाईवरच त्या त्या राष्ट्राची भिस्त असते. सध्या बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कळत नकळत गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. युवक दिशाहीन होत चालला. त्यामुळे हा प्रकार रोखण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून यवतमाळ जिल्हा पोलीस दलाचे ‘ऑपरेशन प्रस्थान’ सुरू केले. हा रोजगार मेळावा युवकांचं भविष्य बदलवणारा आहे. यातून केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारतासह विदेशातही नोकरीची संधी युवकांना मिळणार आहे. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून व अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ पोलीस दलाने शनिवारी शेतकरी मंदिरात रोजगार मेळावा घेतला. या मेळाव्यात 10 कंपन्यांचे प्रतिनिधी आलेत.

या रोजगार मेळाव्याचा आरंभ उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. सर्वप्रथम त्यांनी उपस्थित रोजगारार्थी उमेदवारांशी संवाद साधला. आलेल्या 10 कंपन्यांच्या प्रतिनिधींचा परिचय करून दिला. त्यानंतर कंपनींच्या प्रत्येक प्रतिनिधीने कंपनीची आणि जॉबबद्दल माहिती दिली. अधिकाधिक कंपन्या ह्या हैद्राबादच्या होत्या हे विशेष.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वणी, शिरपूर, मारेगाव, मुकुटबन व पाटण पो.स्टे. हद्दीतील युवक व युवतनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये ११०२ युवक व ११८ युवतींनी नोंदणी केली. सदर रोजगार मेळाव्यात एकूण 1320 युवक व युवती यांच्या मुलाखती झाल्यात. या मुलाखतीमध्ये पात्र उमेदवारांना लवकरच कंपनीकडून नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. छाती आणि उंची या निकषात युवक बसले नाही तरीही त्यांनी खचू नये. त्यांना त्यांच्या पात्रतेच्या रोजगाराच्या संधी मिळतील. असा आशावाद वणीचे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी व्यक्त केला.

उमेदवारांसाठी सर्व कंपन्यांचे वेगवेगळे स्टॉल लागले होते. यशस्वी ग्रुप हैदराबाद (99 49 111 0 57)ने आयटीआय अकरावी आणि पुढे शिकलेल्या उमेदवारांना संधी दिली. हैदराबाद येथील Thredz it या कंपनीने टेली मार्केटिंग, एक्झिक्यूटिव्ह, टेली कॉलिंग फीमेल, कस्टमर सपोर्ट, आयटी डेव्हलपर्स ,बस कॅप्टन, ,फार्मासिस्ट, डाटा एन्ट्री ऑपरेटर्स, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, बिझनेस डेव्हलपमेंट, एक्झिक्यूटिव्ह टीम लीडर्स रिलेशनशिप मॅनेजर, एटीएम सुरक्षा रक्षक प्रोडक्शन, या क्षेत्रातील संधींची ऑफर दिली.

Threshold solutions या कंपनीचे जितेंद्र प्रसाद यांनी उमेदवारांना कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह, टेली सेल्स, कलेक्शन्स ऑफिसर्स, कॉल सेंटर, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज, सेक्युरिटी जॉब, बिजनेस डेव्हलपमेंट एक्झिक्यूटिव्ह, ग्राफिक डिझायनर्स, फुड इंडस्ट्रीज, सायबर सेक्युरिटी या क्षेत्रांतील संधींची माहिती दिली.

Medplus कंपनीचे प्रतिनिधी जगन यांनी नव्या आणि अनुभवी फार्मासिस्ट यांना संधी असल्याचं सांगितलं. अप्रेंटिस, एफएसआय, बोनस, ग्रॅच्यूटी, अपघात विमा असेही लाभ मिळणार असल्याचं सांगितलं. Gmr cargo या कंपनीने
लोडिंग, अनलोडींग, ड्रायव्हर, हाउसकीपिंग, सुपरवायझर, प्रोजेक्ट असिस्टंट, इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग यातील संधी स्पष्ट केल्यात.

G4S या कंपनीने सिक्युरिटी गार्ड, महिला सुरक्षा रक्षक, आर्मड गार्ड, एक्स आर्मी मेन यांच्या संधी सांगितल्या. राळेगाव येथील प्रथम कौशल्य प्रशिक्षण केंद्राने ग्रामीण आणि शहरी भागांतील बेरोजगारांना संधी दिल्यात. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन ही एक एनजीओ आहे. ही एनजीओ एज्युकेशनवर काम करते. शिक्षणावर काम करते. त्यानंतर प्लेसमेंटवर काम करते. या एज्युकेशन संस्थेमध्ये 45 दिवसांचे ट्रेनिंग राहील. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये कोर्सेस आहेत.

ज्याच्यामध्ये हाउसकीपिंग सर्विस आणि ऑटोमोबाईल, फोर व्हीलर अशा विविध संधी आहेत. उमेदवार त्या त्या पोलीस स्टेशनमार्फत आले की, त्यांना संधी मिळतील. नॅन्सी हेल्थ केअर सर्विस रुग्णसेवा, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा सांभाळ व त्यांची सेवा तसेच नर्सिंग क्षेत्रात काम करते. कॅपिटल प्रोटेक्शन फोर्स सुपरवायझर ऑल इंडिया, ऑल महाराष्ट्रात ऑफर करत आहे.

एकलव्य कुशल या संस्थेने महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील18 ते 45 वयोगटातील उमेदवारांसाठी संधी आणल्या आहेत. ते 2 महिन्यांचे मोफत प्रशिक्षणही देतील. जनरल ड्युटी असिस्टंट (नर्सिंग), फूड अँड बिव्हरेज (हॉस्पिटॅलिटी), वेअर हाऊस पॅकर, रिटेल सेल्स असोसिएटस अशा संधी देत आहेत. या मेळाव्यात महाराष्ट्र, संपूर्ण भारत आणि भारताबाहेरही रोजगाराच्या संधी मिळू शकतात. जवळपास सर्वच कंपनी ह्या मोफत प्रशिक्षण देणार आहेत.

या शिबिराचा प्रभार वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी यशस्वीरीत्या सांभाळला. आलेल्या उमेदवारांना निकषांची अडचण आल्यास अन्य ठिकाणी संधी मिळेल असा आशावाद दोघांनीही व्यक्त केला.

वणीचे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, मारेगावचे पोलीस निरीक्षक संजय सोळंके, मुकुटबनचे पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर, पाटणचे पोलीस निरीक्षक स्वप्निल ठाकरे, शिरपूरचे पोलीस निरीक्षक माधव शिंदे यांनी संपूर्ण उपविभागात या रोजगार मेळाव्यासाठी जनजागृती करून नियोजन केले. या सर्व पोलीस ठाण्याचे स्वतंत्र स्टॉल मेळाव्याच्या प्रवेशद्वारावर लागले होते. येणाऱ्या उमेदवारांची नोंदणी आणि शंकांचे समाधान केले. उन्हाचे दिवस असल्याने ठिकठिकाणी पिण्याच्या गार पाण्याची व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे सर्व उमेदवारांसाठी मोफत भोजन व्यवस्था आणि तीदेखील नियोजित वेळेत होती.

Comments are closed.