शहराच्या डी.पी. आराखड्यास नागरिकांचा तीव्र विरोध
संभाजी ब्रिगेड आक्रमक, आराखड्यास स्थगितीची मागणी
पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी शहराचा प्रारूप विकास आराखडा (डी.पी. प्लॅन) नुकताच जाहीर झाला असून, हरकती व सूचना नोंदविण्याची अंतिम मुदत 30 जुलै 2025 ठरविण्यात आली आहे. त्याला संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेत आराखड्यास स्थगितीची मागणी केली आहे. सध्या वणी नगर परिषदेमध्ये लोकप्रतिनिधींची निवड झालेली नाही. यामुळे जनतेच्या प्रतिनिधीविना आराखडा पुढे रेटणे नागरी हक्कांवर अन्याय असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय पांडुरंग धोबे यांनी नगर परिषदेला निवेदन देऊन हा आराखडा तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, डी.पी. आराखड्याबाबत सामान्य नागरिक, व्यापारी, गृहनिर्माण संस्था आणि शेतकऱ्यांना पुरेशी माहिती दिली गेली नाही. झोनिंग, रस्त्यांचे आरक्षण आणि मालमत्तांवरील हस्तक्षेप याबाबत गंभीर आक्षेप असून, नागरिकांचा सहभाग फक्त औपचारिकता ठरत आहे.
संभाजी ब्रिगेडने निवेदनातून डी.पी. आराखडा तात्काळ स्थगित करावा, नवीन लोकप्रतिनिधी निवड होईपर्यंत अंतिम मंजुरी देऊ नये, सर्वपक्षीय आणि सर्वस्तरीय सल्लागार बैठक आयोजित करावी, हरकती व सूचनांवर लेखी प्रतिसाद द्यावा, संभाजी ब्रिगेडने इशारा दिला की, लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या विश्वासाशिवाय आराखडा मंजूर झाला, तर जनआंदोलन छेडले जाईल.


Comments are closed.