जितेंद्र कोठारी, वणी : झरी तालुक्यातील चिलई येथील एक्सेलो डोलोमाईट खदाणीतून ओव्हरलोड वाहतुकीमुळे चिलई ते गणेशपूर रस्त्याची पुरती वाट लागली आहे. 8 टन भारवहन क्षमतेच्या या ग्रामीण रस्त्यावर 28 ते 35 टन डोलोमाईट स्टोन भरलेले हायवाची वाहतूक सुरु आहे. त्यामुळे या रस्त्याची चाळणी झाली आहे. ओव्हरलोड वाहतुकीबाबत गावकऱ्यांनी अनेकदा तक्रार करुनही प्रशासन, एक्सेलो कम्पनी व ट्रान्सपोर्टर तक्रारीकडे कानाडोळा करीत आहे.
चिलई येथील डोलोमाईट खाणीतून भालर येथील रॉकवेल लाईम फॅक्टरी मध्ये डोलोमाईट दगडाचा पुरवठा केल्या जाते. सालासार ट्रान्सपोर्ट व इतर काही ट्रान्सपोर्ट कंपन्यांकडून रात्रंदिवस येथून ओव्हरलोड वाहतूक केली जाते. त्यामुळे या चिलई ते गणेशपूर पर्यंत रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहे. एवढेच नव्हे तर ओव्हरलोड वाहनांमुळे नव्याने बांधण्यात आलेला वणी कायर पुरड महामार्ग अनेक ठिकाणी दबला आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या 3.50 मीटर रुंदीच्या व 8 टन भारवहन क्षमतेच्या या रस्त्यावर 12 चाकी हायवामध्ये सर्रास 35 टन दगड घेऊन वाहतूक होत असल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. तेजापूर व चिलई येथील नागरिकांना कामानिमित्त मुकुटबन व वणी जाताना येताना नेहमी अपघाताची भीती असते.
ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाईचे अधिकार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस व महसूल अधिकाऱ्यांना आहे. मात्र ट्रान्सपोर्ट कंपन्यासोबत अर्थपूर्ण संबंधामुळे चिलई तेजापूर येथील नागरिक वेठीस धरले जात आहे. परिवहन विभागाने ओव्हरलोड वाहतुक तात्काळ थांबवावी अन्यथा चिलई येथील नागरिकानी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Comments are closed.