मारेगाव फार्मसी महाविद्यालयात फार्मसिस्ट दिन उत्साहात साजरा

रक्तदान शिबिर व मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मारेगाव येथील श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थे द्वारा संचालित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डी फॉर्म व बि फॉर्म) महाविद्यालयात फार्मसिस्ट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत रक्तदान शिबिर व विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करण्यात आली.  कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून भारतीय नौसेनेतून निवृत्त व सध्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक शेखर केळकर व मारेगावचे नायब तहसीलदार यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्घाटनपर भाषणात बोलताना शेखर केळकर म्हणाले की विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताचा विचार करत स्वामी विवेकानंद आणि डॉ कलाम सारख्या महापुरुषांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी. यावेळी नायब तहसिलदार यादव यांच्या हस्ते  मतदार नोंदणी शिबिरास सुरुवात झाली. यावेळी अजय लुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील ५० विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी रक्तदान केले व ८० च्या वर विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करण्यात आली. रक्तदान शिबिर करिता यवतमाळ येथील एकनील रक्तपेढी व मतदार नोंदणी करिता मारेगावं तहसील कार्यालयाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीलेश चचडा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्य बोबटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार समृद्धी गजभिये यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. गजानन गुजटवार व प्रा.आकांक्षा पानजवार, प्रा.अंकिता इंगळे, प्रा. स्नेहल वैद्य, प्रा. सोनू चटप, प्रा. खुशाल दारूनकर, प्रा.मारोती जेऊरकर इतर सर्व प्राध्यापक वृंद विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.