दुचाकी चोरट्यांचा शहरात हैदोस, बस स्टँड आणि मार्केटमधून दुचाकी लंपास

दुचाकी चोर, त्यांना नाही सीसीटीव्हीचं भेव... गरीबांचे मोठे नुकसान...

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात दुचाकी चोरट्यांचा हैदोस काही थांबेना. नुकत्याच दुचाकी चोरीच्या दोन घटना समोर आल्या आहेत. यातील एक घटना तर सकाळी 6 वाजताच्या सुमारास बसस्टँड परिसरात घडली. तर दुसरी घटना मुख्य मार्केटमध्ये घडली. बाहेरगावाहून मजुरीसाठी अनेक लोक दुचाकीने वणीला येतात. यात अशा गरीबांचे चांगलेच आर्थिक नुकसान होत आहे. सातत्याने होणा-या दुचाकी चोरीमुळे वणीकर चांगलेच हैराण झाले असून हे सत्र कधी थांबणार? असा सवाल सर्वसामान्य वणीकर उपस्थित करीत आहे.

निखील नवनाथ चिडे (33) हे ब्राह्मणी येथील रहिवासी असून ते वेकोलि राजूर येथे नोकरीवर आहे. ते ब्राह्मणी वरून रोज राजूर येथे ड्युटीवर त्यांच्या होन्डा कंपनीच्या युनिकॉन (MH-29 BA3774) दुचाकीने जातात. दिनांक 17 सप्टेंबर रोजी ते नेहमी प्रमाणे ड्युटीला गेले होते. मात्र रात्री 1 वाजता ड्युटी संपून परतताना त्यांची वणीजवळ दुचाकी पंक्चर झाली. त्यामुळे ते रात्री बसस्टँडवर गेले. तिथे त्यांनी चंद्रपूर बस लागणा-या प्लॅटफॉर्मच्या बाजूला दुचाकी लावली व रात्रभर मुक्काम केला.

सकाळी 6 वाजताच्या सुमारास ते चहा पिण्यासाठी बाजूला असलेल्या कॅन्टीनवर गेले. त्यानंतर ते चहा पिऊन परत आले असता त्यांना तिथे त्यांची दुचाकी आढळली नाही. त्यांनी परिसरात शोध घेतला मात्र दुचाकी आढळली नसल्याने त्यांनी अखेर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली.

विलास बापुरावज निखाडे (27) हा मुर्धोनी येथील रहिवासी असून तो वणी येथील मुख्य मार्केट येथील अंजली कापड केंद्र येथे कामगार म्हणून काम करतो. त्याच्याकडे राखाडी रंगाची स्प्लेंडर (MH-29 Z-8675) ही दुचाकी आहे. दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता विलास मुर्धोनीवर वणीसाठी कामाला आला. त्याने आपली दुचाकी जवळच्या दुकानासमोर लावली. संध्याकाळी 7 वाजता ड्युटी संपल्यावर विलास दुचाकी ठेवलेल्या जागेवर गेला असता तिथे त्याला दुचाकी आढळून आली नाही. अखेर त्याने वणी पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली. 

दुचाकी चोर त्यांना नाही सीसीटीव्हीचे भेव…
शहरातील घरफोडीच्या घटनांमध्ये काही प्रमाणात कमतरता आली असली तरी दुचाकी चोरटे मात्र अद्यापही मदमस्त आहेत. मार्केट, बँक, ट्युशन, दुकाने, बस स्टँड इ. ठिकाणी दुचाकी ठेवतात. अशा ठिकाणी सीसीटीव्ही लावलेले असतात. मात्र त्यानंतरही चोरटे दुचाकीवर हात साफ करीत आहे. याशिवाय अनेक घरी पार्किंग किंवा गाडी ठेवण्याची जागा नसते. अशा वेळी ते अनेक वर्षांपासून दुचाकी घराबाहेर लॉक करून ठेवतात. अशा दुचाकी चोरट्यांच्या रडारवर असून चोरटे अशा दुचाकी लंपास करीत आहे. 

चोरीच्या दोन्ही घटनेत पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे. वणीतील सुरू असलेले दुचाकीचोरींचे सत्र कधी थांबणार असा? सवाल वणीकर उपस्थित करीत आहे.

Comments are closed.