बहुगुणी डेस्क, वणी: वणीमध्ये धूम स्टाईल रेसिंग बाईक चालवणा-यांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. यातील एका बाईकवर तब्बल साडे 12 हजारांपेक्षा अधिकचा तर दुस-या बाईक चालकाला अडीच हजारांपेक्षा अधिकचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच या दोन बाईक जप्त देखील करण्यात आल्या. त्यामुळे धूम स्टाईल बाईक चालवणे त्यांना चांगलेच महागात पडले आहे. रविवारी संध्याकाळी वाहतूक विभागाद्वारे ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने धूम स्टाईल रेसिंग बाईक चालवणा-यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. विशेष म्हणजे आता पालकांवरही कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना वाहन देताना काळजी घ्यावी, असे आवाहन वाहतूक विभागाद्वारे करण्यात आले आहे.
सध्या वणीतील तरुणाईत धूम स्टाईल रेसिंग बाईकचे चांगलेच फॅड आले आहे. यातून अनेकदा अपघात झाले आहेत. याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून तक्रारही करण्यात आल्या होत्या. रविवारी दिनांक 31 ऑगस्ट रोजी जैन ले आऊट येथे दोन तरुण धूम स्टाईल रेसिंग बाईक चालवत होते. यामुळे अपघाताची शक्यता होती. काही नागरिकांनी या रेसिंग बाईक चालक तरुणांची तक्रार पोलिसांकडे केली. त्यावरून वाहतूक विभागाचे पथक जैन ले आऊट येथे गेले. तिथून त्यांनी (MH 29 CL1790) आणि (MH29 CG8758) या क्रमांकाच्या दोन रेसिंग बाईक जप्त केल्या. तसेच या बाईकचे चालक सतीश रामदास हिवरकर आणि सुखदेव सुनील भोयर (दोघेही रा. गणेशपूर/छोरिया ले-आऊट, वणी) यांना ताब्यात घेतले. या दोघांकडेही ड्रायव्हिंग लायसन्स तसेच दुचाकीचे इतर आवश्यक कागदपत्रे आढळले नाही. त्यावरून पोलिसांनी पहिल्या बाईकवर 12 हजार 750 रुपयांचा तर दुस-या बाईकवर 2 हजार 750 रुपयांचा दंड आकारला.
पालकांनो सावधान ! तुमच्यावरही होऊ शकते कारवाई
वणीतील तरुणाईत सध्या रेसिंगचे फॅड वाढत आहे. त्यामुळे रस्त्यावर सुसाट दुचाकी चालवताना अनेक तरुण दिसतात. यातील काही तरुण हे अल्पवयीन देखील आहेत. तर अनेकांकडे आवश्यक तो परवाना देखील नाही. त्यामुळे पालकांवर देखील कारवाई होऊ शकते. त्यामुळे पालकांनी मुलांना रेसिंगसाठी बाईक देऊ नये असे आवाहन वाहतूक विभागाद्वारे करण्यात आले आहे.
कायदा काय सांगतो?
मोटर वाहन कायदा, 1988 (Motor Vehicles Act, 1988) नुसार वाहन चालवण्यासाठी कमीतकमी 18 वर्षे वय आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे. अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवल्यास कलम 3 नुसार पालक किंवा वाहन मालकावर दंड आणि कारवाई होऊ शकते. जर वाहन मालकाने जाणूनबुजून अल्पवयीन व्यक्तीला वाहन दिले आणि त्याने अपघात किंवा कायदेशीर उल्लंघन झाले, तर वाहन मालकाला 1,000 ते 5,000 रुपये दंड आणि/किंवा 3 महिन्यांपर्यंत शिक्षा होऊ शकते. जर रॅश ड्रायव्हिंग किंवा सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण केल्यास कलम 199A व जिवाला धोका निर्माण झाल्यास बीएनएसच्या कलमांतर्गत दंड व कारवाई होऊ शकते. जर यात अल्पवयीन मुलगा असेल तर यासाठी पालकांना जबाबदार धरले जाऊ शकते व पालकांना दंड व शिक्षा आकारली जाऊ शकते.



Comments are closed.