बहुगुणी डेस्क, वणी: पोलीस पाटलावर एकाने लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. या मारहाणीत पोलीस पाटील जखमी झालेत. पंढरी अरुण डुकरे असे पोलीस पाटलांचे नाव आहे. रविवारी दिनांक 3 मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास खडकडोह येथील बस स्टॉपवर ही घटना घडली. या प्रकरणी मारहाण करणारा आरोपी मोरेश्वर याच्याविरोधात विविध कलामानुसार मुकुटबन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, पंढरी अरुण डुकरे (35) हे चिचघाट ता. झरी येथील रहिवासी असून ते शेती करून आपला प्रपंच चालवतात. ते गेल्या 6 वर्षांपासून चिचघाट येथे पोलीस पाटील या पदावर देखील आहे. सोमवारी दिनांक 3 मार्च रोजी ते त्यांच्या भावाच्या शेतात मजुरासाठी डब्बा पोहोचवण्यास जात होते. दरम्यान खडकडोह बस स्टॉपवर आरोपी मोरेश्वर परशुराम सरोदे (38) रा. खडकडोह हा उभा होता. पंढरी यांना पाहून मोरेश्वरने त्यांना अश्लिल भाषेत शिविगाळ केली. त्यावर पंढरी याने शिविगाळ का करतो अशी विचारणा केली असता मोरेश्वरने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र वाद वाढू नये म्हणून पंढरी तिथून निघून गेले.
संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास पंढरी हे मजुरास खडकडोह येथे सोडण्यास गेले. दरम्यान बस स्टॉपवर मोरेश्वर दुचाकीवर बसून होता. त्याचा हाती एक लोखंडी रॉड होता. पंढरी दिसताच तो त्याच्या हातातील रॉड घेऊन पंढरीच्या अंगावर धावून गेला. त्याने पहिला वार पंढरीच्या डोक्यावर केला. तुला आज खतमच करतो असे म्हणत मोरेश्वरने पुन्हा पंढरीवर वार केला. हा वार पंढरीच्या डोक्यावर केला. मात्र वार चुकवल्याने हा वार पाठीवर बसला. डोक्यावर जबर मार लागल्याने पंढरी घटनास्थळी बेशुद्ध होत खाली कोसळले.
दरम्यान पंढरीचे भाऊ अविनाश डुकरे हे घटनास्थळी आले. त्यांनी आरडाओरड करताच आरोपी मोरश्वर तिथून पळून गेला. अविनाश यांनी त्यांचा जखमी भाऊ पंढरीला उचलून कारमध्ये टाकले. अविनाश यांनी याची माहिती मुकुटबन पोलिसांना दिली व पंढरीला उपचारासाठी वणी येथे आणले. त्यानंतर अविनाश यांनी मुकुटबन पोलीस ठाण्यात आरोपी मोरेश्वर सरोदे याच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी मोरेश्वरवर बीएनएसच्या कलम 118 (2) 296 व 351 (2) नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी क्रॉस तक्रार झाल्याचीही माहिती आहे.
Comments are closed.