प्रवीण खानझोडे : संघर्षातून घडलेलं प्रेरणादायी व्यक्तिमत्व

व्यवसायात नेतृत्व, समाजकारणात सक्रियता – दुहेरी जबाबदारी निभावणारा कार्यकर्ता

निकेश जिलठे, वणी: आजच्या राजकारणात आणि समाजकारणात जात, धर्म, पक्षीय निष्ठा हेच एखाद्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते. अशा वातावरणात केवळ माणुसकीला सर्वोच्च मानणारे, जात-धर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येकामध्ये ‘माणूस’ शोधणारे कार्यकर्ते फारच थोडे. अशा मोजक्या लोकांमध्ये वणीतील एक नाव सातत्याने पुढे येते ते नाव म्हणजे प्रवीण खानझोडे. व्यवसायाने ते रिलायन्स निप्पोन लाईफमध्ये BDM म्हणून कार्यरत आहे. मात्र त्यांची खरी ओळख सामाजिक कार्यकर्ता अशीच निर्माण झाली आहे. फुले–शाहू–आंबेडकरांच्या प्रगत विचारांची कास धरत त्यांनी राजकारणाला कधीही सत्तेचा मार्ग न मानता समाजपरिवर्तनाचा मार्ग मानला. त्यामुळेच लोकांच्या समस्या, सामाजिक प्रश्न आणि न्याय-अन्यायाच्या लढ्यात ते नेहमीच अग्रभागी दिसतात. आता प्रवीण खानझोडे राजूर–चिखलगाव सर्कलमधून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असून त्यासाठी त्यांनी प्रारंभिक हालचाली सुरू केल्या आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद, स्थानिक प्रश्नांची जाण, आणि सातत्यपूर्ण उपस्थिती—यामुळे त्यांचे नाव तळागाळात पोहोचू लागले आहे. आज त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्त वणी बहुगुणीचा हे स्पेशल आर्टिकल.

प्रवीण खानझोडे : संघर्षातून घडलेलं व्यक्तिमत्व
आज जरी सुटबुटात, आत्मविश्वासाने झळकणारे प्रवीण खानझोडे दिसत असले तरी त्यांच्या आयुष्याचा प्रवास अत्यंत खडतर आणि थक्क करणारा आहे. वडिलांची अचानक नोकरी जाणे, घरची जबाबदारी खांद्यावर येणे, शालेय जीवनातच मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावणे—या सगळ्या टप्प्यांतून ते पुढे सरकत गेले. एका सामान्य कुटुंबातील मुलगा खासगी कंपनीत उच्च पदावर पोहोचून इतरांना रोजगार देऊ लागला, ही कहाणी एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच आहे.

प्रवीण यांचा जन्म 17 नोव्हेंबर 1978 रोजी गौराळा (मारेगाव रोड) येथे झाला. वडील WCL मध्ये नोकरीला होते. 1979 मध्ये वडिलांची बदली राजूर येथे झाल्याने संपूर्ण परिवार तिथे स्थायिक झाला. प्रवीण यांचे सहावीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत, तर दहावीपर्यंतचे शिक्षण राष्ट्रीय विद्यालय, राजूर येथे झाले. सहावीत असतानाच त्यांच्या आयुष्यात मोठा धक्का बसला—वडिलांनी अचानक नोकरी सोडली. घरचं आर्थिक गणित बिघडलं. त्यावेळी अवघ्या 14 व्या वर्षी प्रवीण यांनी मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावण्याचा निर्णय घेतला. मात्र शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ नये याची त्यांनी विशेष काळजी घेतली. या काळात त्यांचा संपर्क आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांशी आणि मित्रांशी आला. त्यांच्या सहकार्याने शिक्षण सुरू राहिलं आणि त्याच वेळी प्रवीण यांचा आंबेडकरी विचारांशी घट्ट संबंध जुळला.

शाळेत असताना सकाळ-संध्याकाळ किराणा दुकानात काम करणे आणि दिवसा अभ्यास करणे, ही त्यांची दिनचर्या होती. दहावी नंतर त्यांनी वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि बीए पर्यंत शिक्षण पूर्ण केले. कॉलेजच्या काळात फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेने प्रभावित होऊन त्यांनी या चळवळीची कास धरली. तेव्हापासून आजपर्यंत त्यांचा प्रवास सुरू आहे—संघर्षातून घडलेला, समाजाशी बांधीलकी जपणारा आणि प्रेरणादायी.

थोडक्यात कार्य : 
विद्यार्थी चळवळीपासून सुरुवात करून प्रवीण खानझोडे यांनी राजकीय चळवळीतही पाऊल टाकले. मात्र त्यांचा खरा ओढा समाजकारणाकडे आहे. राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर सामाजिक प्रश्नांचा पाया मजबूत असणे गरजेचे आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या आदर्शावर ते चालतात. ते आज शोषित, वंचित, ओबीसी आणि बारा बलुतेदारांच्या चळवळीत सातत्याने कार्यरत आहेत. ओबीसी समाजात हक्कांविषयी जनजागृतीची नितांत गरज आहे. या जाणिवेतून त्यांनी ओबीसी परिषदेचे गठन केले आणि त्याच्या माध्यमातून समाजात जनजागृतीचे कार्य सुरू केले. बलुतेदार म्हणजे गावकामगार—पिढ्यानपिढ्या पारंपरिक काम करणारे हे 12 बलुतेदार आजही न्याय आणि हक्कासाठी झगडत आहेत. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी प्रवीण खानझोडे बारा बलुतेदार संघटनेच्या माध्यमातून काम करीत आहेत. वणी विधानसभा क्षेत्रातील गावपातळीवर बलुतेदारांना संघटीत करण्याचे काम सध्या जोमात सुरू आहे.

व्यवसायाच्या क्षेत्रातही त्यांची वाटचाल तितकीच उल्लेखनीय आहे. गेल्या दहा वर्षांपासून ते रिलायन्स निप्पोन लाईफमध्ये BDM म्हणून कार्यरत आहेत. व्यवसाय करतानाही सामाजिक कार्य सुरूच ठेवून त्यांनी वणी परिसरातील अनेक होतकरू लोकांना आर्थिक मदत केली आहे. चार वर्षांपूर्वी त्यांनी व्यावसायिक प्रतिष्ठानाच्या माध्यमातून व्यवसाय क्षेत्रातही पाऊल ठेवले. सामाजिक कार्यकर्ता अनेकदा स्वतःच्या घराकडे दुर्लक्ष करतो, पण प्रवीण खानझोडे यांनी आधी कुटुंबाची जबाबदारी योग्यरित्या पार पाडली आणि त्यानंतर तितक्याच जोमाने समाजकारणात झोकून दिले. आज त्यांची ओळख स्वतंत्रपणे सांगावी लागत नाही. तरुणांसमोर आदर्श कार्यकर्ता म्हणून ते उभे आहेत, तर व्यवसायात ते एक टीम लीडर म्हणून नेतृत्व करतात.

 

जिल्हा परिषदसाठी तयारी सुरु
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत राजूर–चिखलगाव सर्कलमधून प्रवीण खानझोडे यांनी इच्छुक उमेदवार म्हणून आपली तयारी सुरू केली आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आधीच तळागाळात पोहोचली असून, फुले–शाहू–आंबेडकरी विचारांचा धागा पकडून त्यांनी राजकारणाला सत्तेचा मार्ग न मानता समाजपरिवर्तनाचे साधन मानले आहे. ओबीसी, बारा बलुतेदार आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या या कार्यकर्त्याने स्थानिक प्रश्नांची जाण, कार्यकर्त्यांशी संवाद आणि सातत्यपूर्ण उपस्थिती यामुळे जनतेत विश्वास निर्माण केला आहे. व्यवसायात नेतृत्व करताना समाजकारणातही सक्रिय राहणारे प्रवीण खानझोडे आता राजूर–चिखलगाव सर्कलच्या जनतेसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करण्यास उत्सुक आहेत.

प्रवीण खानझोडे यांना व्यवसाय, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

Comments are closed.