केशव नागरी पतसंस्थेच्या सदस्य पदावर प्रा. खाडे कायम

विवेक तोटेवार, वणी : येथील केशव नागरी सहकारी पतसंस्थेचे सदस्य प्रा. महादेव खाडे यांचे सदस्यत्व कायम ठेवण्याचा निर्णय विभागीय सह निबंधक (सहकारी संस्था) अमरावती यांनी दिला आहे. जिल्हा उप निबंधक, यवतमाळ यांच्या आदेशाविरुद्ध प्रा. खाडे यांनी विभागीय सह निबंधक यांच्याकडे अपील दाखल केली होती. प्रा. खाडे यांच्या अपिलीवर सुनावणी करून विभागीय सह निबंधक यांनी 26 एप्रिल 2023 रोजी निर्णय दिला. केशव नागरी सहकारी पतसंस्थेचे सदस्य प्रा. महादेव खाडे यांनी याबाबत 26 जून रोजी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

प्रा. महादेव खाडे हे केशव नागरी पतसंस्थेचे संस्थापक संचालक व अध्यक्ष होते. त्यांच्यावर संस्थेची बदनामी केल्याचा आरोप करुन मुख्याधिकारी व संचालकांनी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला. व डिडीआर ने या निर्णयाला मंजुरी दिली. या आदेशाविरुद्ध प्रा. खाडे यांनी विभागीय सहनिबंधक अमरावती यांच्याकडे अपील केली. शेवटी 26 एप्रिल 2023 रोजी विभागीय सहनिबंधक यांनी प्रा. खाडे यांचे सदस्यत्व कायम ठेवण्याचा निर्णय दिला. याबाबतची माहिती सोमवार 26 जून रोजी शासकीय विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रा. खाडे यांनी पत्रकारांना दिली.  

 प्रा. महादेव खाडे यांनी केशव नागरी पतसंस्थेचे रूपांतर वटवृक्षात केले. ते संस्थेचे संस्थापक, सदस्य, संचालक, व अध्यक्ष होते. ते अध्यक्ष असतांना मुख्याधिकारी दीपक दीकुंडवार यांनी भ्रष्टाचार केल्याचे खाडे यांच्या लक्षात आले. यावेळी खाडे यांनी सहकार नियमानुसार 145 लाख रुपये जिल्हा बँकेत जमा करायला सांगितले. तेव्हापासून मुख्याधिकारी दीपक दिकुंडवार, संस्थेचे उपाध्यक्ष दौलत वाघमारे व मानद सचिव अनिल अक्केवार यांनी संस्थेची बदनामी केल्याचा ठपका ठेवत खाडे यांचे सदस्यत्व रद्द करण्याकरिता हालचाली सुरू केल्या. 

8 जानेवारी 2020 ला संस्थेची विशेष सभा बोलविण्यात आली. या सभेत प्रा. महादेव खाडे यांचे केशव नागरी सहकारी पतसंस्थेचे सदस्यत्व रद्द केल्याचा ठराव पारित करून तात्काळ जिल्हा उप निबंधक यांना मंजुरी करिता पाठविले. तसेच त्यांचे मतदार यादीतूनही नाव कमी करण्यात आले. जिल्हा उप निबंधक यांनी ठरावाला मंजुरी देत प्रा. खाडे यांचे सदस्य पद रद्द करण्याचा निर्णय दिला. जिल्हा उप निबंधकाच्या या निर्णयाला प्रा. महादेव खाडे यांनी आव्हान देत विभागीय सह निबंधक (सहकारी संस्था) अमरावती यांच्याकडे अपील दाखल केली.

दरम्यान पतसंस्थेचे सदस्य असताना संस्थेची बदनामी केल्याच्या आरोपावरून प्रा. खाडे यांच्याविरुद्ध काही संचालकांनी वणी न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल दिला. वणी न्यायालयाच्या आदेशाला प्रा. खाडे यांनी केलापूर सत्र न्यायालयात आव्हान दिले. त्यावर सत्र न्यायालयाने 14 जानेवारी 2022 रोजी वणी न्यायालयाचा निकाल रद्द करून प्रा. खाडे यांच्या बाजूने निकाल दिला. 

विभागीय सह निबंधक यांनी निकाल 26 एप्रिल 2023 रोजी महादेव खाडे यांच्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याने त्यांचे सदस्यत्व कायम ठेवण्याचा निर्णय दिला. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 35 (1) नुसार संस्थेने केलेल्या कारवाई व जिल्हा उप निबंधक यांच्या आदेशावर ताशेरे ओढले. विभागीय उप निबंधक यांनी दिलेल्या निर्णयानंतर प्रा. महादेव खाडे हे विरोधकांना काय उत्तर देतील याकडे सर्व वणीकरांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.