‘मच्छी पहले कौन खायेगा’ वरून दोन कर्मचा-यात राडा, एकाला झा-याने मारहाण

राजूर येथील वेकोलिच्या क्लबमध्ये रंगला काला पत्थर सिनेमाचा सीन, गुरुवारी आणि वेकोलिच्या सुरक्षा सप्ताहा दरम्यानच घडली घटना...

बहुगुणी डेस्क, वणी: काही वर्षांपूर्वी काला पत्थर नावाचा एक सिनेमा आला होता. कोळसा खाणीची पार्श्वभूमी असलेल्या या सिनेमातील खाणीच्या कॅन्टीनमध्ये चहा मागवण्याचा सीन खूपच प्रसिद्ध आहे. खाणीत काम करणारे दोन मजूर अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा हे चहा पिण्यासाठी कॅन्टीनमध्ये जातात. तिथे चहावरून या दोघांमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगते. शत्रुघ्न सिन्हा कॅन्टीनमध्ये पहिले मी आलो असल्याने पहिले माझ्या टेबलवर चहा आला पाहिजे, अशी वेटरला ताकिद देतो. तर दुसरी कडे अमिताभ बच्चन पहिले मी ऑर्डर दिल्याने चहा माझ्या टेबलवर पहिले आला पाहिजे, अशी ऑर्डर देतो. यात चहा नेणा-या वेटरची चांगलीच गोची होते. गोष्ट हातघाईवर येण्याची वेळ येते. मात्र हा प्रकार खाणीतील साहेब असलेल्या शशी कपूर यांना लक्षात येतो. ते तात्काळ वेटरजवळ जाऊन वेटरच्या हातातला चहा घेऊन पिऊन टाकतात. मध्ये साहेब आल्याने दोन कर्मचा-यांमधला पहिले चहा कोण पिणार? याचा वाद लगेच मिटतो. अशीच काहीशी घटना राजूर कॉलरी येथील वेकोलिच्या क्लबमध्ये घडली. इथे चहा ऐवजी मच्छी होती. तर वाद चांगलाच मारहाण करण्यापर्यंत गेला. शिवाय यात वाद मिटवण्यासाठी कुणी साहेब देखील आले नाही. विशेष म्हणजे गुरुवारी व त्यातल्या त्यात वेकोलिचा सुरक्षा सप्ताहा निमित्त आयोजित कार्यक्रमातच ही घटना घडली.

तक्रारीनुसार, मनोज विधाते (29) हे शेवाळकर परिसर येथील रहिवासी असून ते वेकोलिच्या भांदेवाडा खाणीत नोकरीला आहे. याच ठिकाणी आरोपी श्रीकांत मिलमीले (30) रा. कोना व महेश जुनगरी (30) हे नोकरीला आहे. सध्या वेकोलिच्या खाणीत सेफ्टी वीक सप्ताह सुरू आहे. त्यानिमित्त गुरुवारी दिनांक 30 नोव्हेंबर रोजी राजूर कॉलरी येथील वेकोलिच्या टेम्पो क्लब येथे कार्यक्रम व जेवण आयोजित करण्यात आले होते. या ठिकाणी कर्मचारी असलेले फिर्यादी व आरोपी जेवण करण्यासाठी गेले होते.

कॅन्टीनमध्ये एका कोप-यात मच्छी तळली जात होती. फिर्यादी व आरोपी एकाच ठिकाणी मच्छी घेण्यासाठी गेले. आचारी तिथे मच्छी तळत होता. मच्छी तळून बाहेर काढल्यावर ही मच्छी मनोज यांनी त्यांच्या प्लेटमध्ये घेतली. तेव्हा आरोपींनी मनोज यांना ही मच्छी आम्हाला पाहिजे असे सांगून मच्छी टोपल्यात ठेवण्यास सांगितली. मच्छी पहिले कोण खाणार यावरून दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान श्रीकांत याने मनोजच्या प्लेटला लाथ मारली. तर त्याच्या सोबत असलेल्या महेश जुनगरी याने मच्छी काढण्याचा झारा मनोज यांच्या डोक्यावर मारला. या प्रहाराने मनोज यांचे डोके फुटले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दरम्यान या दोघांनी फिर्यादी मनोज यांना धमकी दिली. घटनेनंतर मनोज यांना दोन कर्मचा-यांनी उपचारासाठी एका रुग्णालयात आणण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर मनोज यांनी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. मनोज विधाते यांच्या तक्रारीवरून आरोपी श्रीकांत मिलमीले व आरोपी महेश जुनगरी या दोघांच्या विरोधात भादंविच्या कलम 324, 34, 504, 506 नुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.