वणीत 3 फटाके विक्रेत्यावर धाड, एक ट्रॅक्टर फटाके जप्त

गांधी चौक, सर्वोदय चौकातील दुकानावर तर एका गोडवूनवर पथकाची धाड.... जप्त केलेला माल भर वस्तीत, मार्केट परिसरात !

बहुगुणी डेस्क, वणी: शहरात आज गांधी चौक येथील कुल्दीवार यांचे दुकान, सर्वोदय चौक येथील नागपुरे सायकल स्टोअर्स या दुकानावर धाड टाकून मोठ्या प्रमाणात फटाक्याचा साठा जप्त केला. तर पालकर यांच्या ग्रामीण रुग्णालयात जवळील गोडावूनवर धाड टाकून गोडावून सील करण्यात आले. दोन्ही दुकानातून प्रत्येकी अर्धा ट्रॅक्टर असा एकूण एक ट्रॅक्टर भरून माल जप्त करण्यात आला. ना. तहसीलदार रविंद्र कापसीकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. जप्त केलेला माल शहराच्या मध्यभागी असलेल्या नगर पालिकेच्या गोडवून मध्ये ठेवण्यात आल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

नियमानुसार फटाक्याची विक्री व साठवणूक ही पालिकेने नियोजित केलेल्या ठिकाणीहून होणे गरजेचे आहे. मात्र या नियमांना हरताळ फासून वणीतील काही दुकानात फटाक्याची साठवणूक करून फटाक्याची विक्री होत असल्याची तक्रार महसूल विभागाला प्राप्त झाली होती. त्यावरून आज मंगळवारी दिनांक 21 नोव्हेंबर रोजी दुपारी महसूलच्या पथकाने याबाबत कारवाई सुरू केली.

दुपारी 3 वाजताच्या दरम्यान गांधी चौक येथील कुल्दीवार यांच्या दुकानात तर सर्वोदय चौक येथील नागपुरे सायकल स्टोअर्स येथे पथकाने धाड टाकली असता त्यांच्या दुकानात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी फटाक्याचा साठा केलेला आढळून आला. ग्रामीण रुग्णालय जवळील पालकर यांच्या गोडावूनमधून फटाका विक्री होत असल्याचे आढळून आल्याने हे गोडावून सील करण्यात आले.

जप्त केलेला ट्रॅक्टर मधला माल

ही कारवाई दुपारी 3 नाजता सुरू झाली तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत संपली. या कारवाईत दोन दुकानातून 1 ट्रॅक्टर भरून माल जप्त करण्यात आला. या मालाची किंमत कळू शकली नसली तरी हा माल सुमारे 2.5 ते 4 लाखांचा असावा असा अंदाज बांधला जात आहे. तर पालकर यांच्या गोडावून मधल्या जप्त केलेल्या मालाची माहिती मिळू शकली नाही. सदर कारवाई ना. तहसीलदार रवींद्र कापसीकर यांच्या पथकाने केली.

जप्त केलेला माल भर वस्तीत, मार्केट परिसरात !
फटाके हे विस्फोटक असल्याने याच्या विक्रीसाठी आणि साठवणुकीसाठी अतिशय कठोर नियम आहे. या कठोर नियमातूनच ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र जप्त केलेला माल नगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या गोडवूनमध्ये ठेवण्यात आला आहे. हे गोडावून शहराच्या मध्यवर्ती भागात असून या समोरच मुख्य मार्केट आहे. शिवाय या गोडावूनमध्ये सुरक्षेची कोणती व्यवस्था आहे याबाबत निश्चित माहिती नाही. एका ठिकाणाहून सुरक्षेच्या कारणावरून उचललेला माल परत शहराच्या मध्यवर्ती भागात ठेवल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त होत असून याची शहरात चांगलीच चर्चा रंगत आहे.

Comments are closed.