दीपक टॉकीज चौपाटी परिसर बनला मटका पट्टीचा अड्डा

पोलिसांची दोन ठिकाणी धाड, दोघांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: वणीत दीपक चौपाटी परिसरातील सुरू असलेल्या 2 मटका पट्टीवर पोलिसांनी धाड टाकली. या प्रकरणी दोन मटका पट्टी फाडणा-या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एक धाड ही दीपक टॉकीज चौपाटी जवळ तर दुसरी धाड ही रामपुरावार्डात टाकण्यात आली. दोन्ही प्रकरणात आरोपींकडून मटकापट्टी लिहिण्याचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. दीपक टॉकीज चौपाटी परिसरात अनेक ठिकाणी अशा पद्धतीने मटका पट्टी घेतली जाते. हे छोटे मासे असले तरी त्यांच्यावर आणखी मोठे मासे आहेत. वणी पोलिसांसमोर मटक्याचे हे जाळे नष्ट करण्याचे आव्हान आहे.

सविस्तर वृत्त असे की शुक्रवारी दिनांक 6 जानेवारी रोजी वणी पोलिसांना दीपक चौपाटी परिसरात एका ठिकाणी मटका पट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून संध्याकाळी सव्वा 7 वाजताच्या सुमारास पोलिसांचे पथक तिथे गेले. तिथे एक व्यक्ती ओमसाई पानठेल्याच्या मागे मटक्याचे नंबर घेत असताना आढळला. पोलीस येताच घटनास्थळावरून काही लोक पळून गेले. मात्र आसिफ नामक एक व्यक्ती पोलिसांच्या हाती आली. 

आरोपी आसिफची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे मटका आकडे लिहिलेली पट्टीबुक, कार्बन तुकडा, पेन व 3640 रुपये नगदी आढळले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामपुरावार्डात पोलिसांची धाड
पेट्रोलिंग करीत असताना वणी पोलिसांना रामपुरावार्डात मटका पट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी सव्वा सात वाजताच्या सुमारास पटेल आरामीलच्या बाजूला धाड टाकली असता इथे एक व्यक्ती मटका पट्टी घेताना दिसली. धाड टाकताच मटका लावणारे लोक पळून गेले. तर मटका पट्टी घेणारा पोलिसांच्या हाती लागला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बाबाराव (48) याला अटक केली आहे. त्याच्याकडे मटका पट्टीचे साहित्य व 330 रुपये रोख आढळून आले. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.