रासा चौपाटीवरील मटका अड्यावर पोलिसांची धाड

जुगार प्रकरणात आरोपींचे नाव सांगण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर आता धाडसत्र

जितेंद्र कोठारी, वणी: जुगार खेळताना अटक झालेल्यांची नाव सांगण्यास असमर्थता दर्शवल्याने टिकेची धनी झालेल्या वणी पोलिसांनी आता जुगार व मटका विरोधात धाडसत्र अवलंबले आहे. मंगळवारी वणी पोलिसांनी रासा चौपाटी येथे सुरू असलेल्या एका मटका अड्यावर धाड टाकून एकास अटक केली आहे.

मंगळवारी दिनांक 9 ऑगस्ट रोजी वणी पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना खब-यांकडून त्यांना रासा परिसरात मटका पट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली. दरम्यान दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास रासा चौपाटीवर येथील एका धाब्याच्या समोर एक इसम काही लोकांना मटका आकडे लिहिलेल्या चिठ्या देऊन त्यांच्याकडून पैसे घेताना आढळला. सदर ठिकाणी मटका सुरू असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. मात्र धाड पडताच लोकांनी तिथून पळ काढला, मात्र जुगार खेळवत असलेला इसम पोलिसांच्या हाती लागला.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दशरथ पंजाबराव मेश्राम (35) रा. रासा ता. वणी याला अटक केली. त्याच्याकडे 2740 रुपये नगदी, वरळी मटका आकडे लिहिलेले पट्टी बुक, पेन इत्यादी साहित्य आढळून आले. आरोपीवर महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

वणी पोलिसांचे मटका, जुगारावर धाडसत्र
शनिवारी दिनांक 6 ऑगस्ट रोजी वणी पोलिसांनी ब्राह्मणी रोडवरील एका देशी भट्टीवरील खोलीत धाड टाकून तिथून 8 लोकांना ताब्यात घेतले होते. यात माजी पंचायत समिती सदस्य, सरपंच, शिक्षक, वेकोलितील कर्मचारी इत्यादींचा समावेश होता. आरोपी प्रतिष्ठीत व राजकीय पक्षाशी संबधित होते. त्यांचे नाव जाहीर करण्यात पोलिसांनी असमर्थता दर्शवल्याने पोलिसांवर चांगलीच टिका झाली होती.

Comments are closed.