बहुगुणी डेस्क, वणी: ज्ञानार्जन आणि ज्ञानवर्धन हा विद्यार्थ्यांचा प्राथमिक गुण. असं असलं तरीही विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्त कलागुण असतात. ते कधी पालकांच्या किंवा शिक्षकांच्या सहज लक्षात येतात. तर कधीकधी येतही नाही. विद्यार्थ्यांच्या नियमित ज्ञानार्जनासह त्यांच्या कलागुणांचा अविष्कार होत असतो. त्यासाठी सशक्त माध्यम ठरतं गॅदरिंग म्हणजेच स्नेहसंमेलन. हेच उदात्त ध्येय ठेवून राजकुवर महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन रविवारी उत्साहात झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष गणेशसिंग राजपूत होते. उद्घाटन प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांनी केलं. प्राचार्य कुणालसिंग राजपूत, प्राचार्य डॉ. युगंधरा शिवनकर, प्रा. राम ठमके आदी मान्यवर उद्घाटन सोहळ्याला प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यार्थ्याच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांना संधी मिळावी हा महाविद्यालयाचा हेतू होता.
शिक्षक हे विद्यार्थ्यांचे आदर्श असतात. ते त्यांचं अनुकरण करतात. हा आदर्श विद्यार्थ्यांपुढे ठेवावा म्हणून प्राचार्य डॉ. युगंधरा शिवणकर यांचा विशेष सत्कार यावेळी झाला. त्यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने यांना आचार्य पदवी प्रदान केली. त्यांच्या या यशाबद्दल त्यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्नेहसंमेलनासाठी महाविद्यालयाच्या स्तरावर वेगवेगळ्या समितींचं गठन करण्यात आलं.
यामध्ये सांस्कृतिक आयोजन समिती, व्यवस्थापन समिती, भोजन समिती व बैठक व्यवस्था समिती होत्या. या आयोजनात प्राध्यापक तथा कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. तसेच वैष्णवी नागपूरे, मिलिंद भगत, अमित पचकटे यांचे मोलाचे योगदान झाले. कार्यक्रमाचे संचालन रेखा गुरनुले यांनी केले. आभार इशा बोबडे यांनी मानले. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. आपल्या सादरीकरणांनी प्रेक्षकांना थक्क केलं.
Comments are closed.