जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी सोमवारी नागपूर येथील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये जाऊन आजारी आकाशची भेट घेतली. हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये मागील 8 दिवसांपासून गंभीर वणी येथील गरीब कुटुंबातील आकाश विजय बगडे (21) हा तरुण भरती आहे. राजू उंबरकर यांनी आकाशच्या तब्येतीची विचारपूस आणि उपचाराबाबत त्यांनी हॉस्पिटलचे मुख्य चिकित्सक डॉ. सारडा यांच्या सोबत चर्चा केली. यावेळी डॉ. सारडा यांनी आकाशची तब्येतीत सुधारणा असून आणखी काही दिवस त्याला आयसीयूमध्ये ठेवणार असल्याचे सांगितले.
सविस्तर वृत्त असे की, वणी येथील बँक कॉलोनी भागात वास्तव्यास असलेले गरीब कुटुंबातील आणि एकुलता आकाश बगडे या तरुणाची तब्येत 26 मार्च रोजी अचानक बिघडली. वणी येथील डॉक्टरांनी त्याला नागपूर येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आकाशला तात्काळ नागपूर येथे रामदासपेठ भागात सुश्रुत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी आकाशच्या उपचाराचा खर्च तब्बल 5 लाख रुपयांपेक्षा जास्त येणार असल्याचे सांगितले.
आई दुसऱ्याच्या घरी स्वयंपाक आणि हमाली काम करणाऱ्या वडिलांकडे एकुलत्या मुलाच्या उपचारासाठी एवढे पैसे नसल्याने पंचाईत झाली होती. मात्र ‘ज्याचा कोणी नाही त्याचा देव’ या म्हण प्रमाणे बँक कॉलोनी, चट्टे ले आऊट, लक्ष्मी नगर भागातील नागरिकांनी आकाशच्या उपचारासाठी 1 लाख रुपये वर्गणी जमा केली. तसेच वणी बहुगुणी न्यूज पोर्टलने गरीब आकाशच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. त्यावर वणी शहर व ग्रामीण भागातून दान दात्यांनी तब्बल एका दिवसात 65 हजार रुपये आकाशच्या आईच्या खात्यात गुगल पे व फोन पे च्या माध्यमातून जमा केले.
गरीब आकाशच्या उपचारासाठी मदत आवश्यक असल्याचे कळताच मनसे नेता राजू उंबरकर यांनी तात्काळ 2 लाख रुपये मदत केली. तसेच आकाशच्या पुढील उपचाराची जबाबदारीसुद्धा त्यांनी स्वीकारली. सोमवार 3 एप्रिल रोजी राजू उंबरकर यांनी प्रत्यक्ष सुश्रुत हॉस्पिटलमध्ये जाऊन आयसीयूमध्ये उपचार सुरु असलेले आकाशची तब्येतीची पाहणी केली. यावेळी मागील 8 दिवसांपासून सतत हॉस्पिटलमध्ये राहून सेवा करणाऱ्या आकाशची नातेवाईक सायली सचिन उपलंचीवार त्यांच्या सोबत होत्या.
Comments are closed.