महादेवाचे दर्शन घेऊन परतताना अपघात, एक ठार तर एक गंभीर

राजूर फाट्याजवळ रात्री दुचाकीचा भीषण अपघात

बहुगुणी डेस्क, वणी: शिरपूर येथे महादेवाचे दर्शन घेऊन राजूर येथे परतताना दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात मागे बसलेला जागीच ठार झाला तर चालक गंभीर जखमी आहे. बुधवारी रात्री साडे 9 वाजताच्या सुमारास राजूर फाट्यानजीक असलेल्या नवीन राजूर टर्निंग जवळ हा अपघात झाला. तनय परशूराम पिंपळकर (22) रा. वणी असे मृत तरुणाचे नाव आहे. तर दुचाकी चालवत असलेला चालक सुमित पांडुरंग मेश्राम (24) रा. राजूर हा गंभीर जखमी आहे.  

प्राप्त माहिती नुसार, मृतक तनय पिंपळकर (22) हा माता यशोदा शाळा जवळ वणी येथील रहिवासी होता. तर सुमित पांडुरंग मेश्राम (24) रा. राजूर हा त्याचा मित्र आहे. बुधवारी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी दुपारी तनय हा सुमित सोबत सुमितच्या काळ्या रंगाची स्प्लेंडर या दुचाकीने (MH29CD 1898) शिरपूर येथील शिवमंदीरात दर्शन घेण्यास गेले होते. संध्याकाळी ते दर्शन घेऊन वणी परत आले. त्यानंतर रात्री ते दोघेही मित्र राजूर येथे परत निघाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दरम्यान रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास राजुर फाट्यापासून न्यू राजूर सिटी जवळील टर्निंग जवळ दुचाकी भरधाव असल्याने चालक सुमितचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी स्लिप होऊन खाली कोसळली. या अपघातात तनयच्या डोक्याला गंभीर मार लागून रक्तस्त्राव झाला. तर चालक सुमित हा गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी घटनेची माहिती वणी पोलिसांना दिली.

तनयला ऍम्बुलन्स बोलवून वणीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तनयला मृत घोषीत केले. तनयच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोउपनि धीरज गुल्हाणे करीत आहे.  

Comments are closed.