बहुगुणी डेस्क, वणी: राजूर परिसरात अनेक छोटे मोठे कारखाने असल्याने इथे मोठ्या प्रमाणात मजुरांची संख्या आहे. सध्या लॉकडाऊनमुळे या मजुरांवर उपासमारीची परिस्थिती आली आहे. मजुरांना अन्न धान्य देण्याची मागणी बिरसा मुंडा येथील रहिवाशांनी केली होती. त्यासंदर्भात त्यांनी दोन दिवसांआधी निवेदनही दिले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर आज सोमवारी दिनांक ३० मार्च रोजी गावातील १०० ते १५० महिलांनी ग्राम पंचायत कार्यालयावर धडक दिली.
चुना उत्पादनासाठी येथे स्थानिक व परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. हे सर्व मजूर कुठल्याही कामगार कायद्याच्या अंमलबजावणीत नसून सर्वच रोजमजुरीवर कार्यरत आहेत. जेवढे काम कराल त्या अनुषंगाने मालकाकडून पैसे दिले जातात. सध्या लॉकडाऊनमुळे येथील सर्व चुना उत्पादनाचे कार्य थांबले आहे. त्यामुळे सगळीकडे पैशाची आवक थांबली आहे. परिणामी मजुरांवर मोठ्या प्रमाणावर उपासमारीची पाळी आली.
यासोबतच हाथठेलेवाले, ऑटोरिक्षा वाले, चुनाभट्टीवर अवलंबून असलेले छोटे व्यावसायिक पूर्णपणे बेरोजगार झाले आहेत. त्यांच्याकडे अन्न धान्य घेण्याची किंवा मास्क व साबण किंवा सॅनिटायजर घेण्याची क्षमता सुद्धा उरली नाही. दुसरीकडे किराणा मालाची आवक बंद झाल्याने किराणा व्यावसायिकांनी अव्वाच्या सव्वा भावात जीवनावश्यक किराणा माल विकणे सुरू केले आहे. परिणामी अनेक गरिबांनी घरातील साहित्य विकून जीवनावश्यक गरजा पूर्ण करीत आहेत.
मजुरांचे हाल होत असल्याने अखेर चिडलेल्या महिलांनी राजूर ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. यावेळेस राजूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक चहानकार व तलाठी कांडलकर, पोलीस पाटील मुन यांनी ह्या महिलांची बाजू ऐकून घेतली व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ह्या मागण्या ठेवण्यात येईल असे सांगितले.
तसेच या वेळेस कुमार मोहरमपुरी, मो.अस्लम, जयंत कोयरे यांनी आर्थिक मदत व अन्न धान्य ताबडतोब मिळणे किती आवश्यक आहे हे पटवून दिले. केंद्र सरकार कडून घोषणा झालेली मिळणारी मदत यायला उशीर होऊ शकतो त्या आधी त्यांना तात्काळ मदत मिळणे अति आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामसेवक व तलाठी यांनी १ एप्रिल पर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन तात्काळ मदत मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले त्यांनंतर आलेल्या ह्या महिला परत फिरल्या. परंतु त्यानंतरही गावातील अन्य महिला ग्रापं कडे धाव घेत होत्या.