निंबाळा येथे रमाई जयंती साजरी, महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन

सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनद्वारा कार्यक्रमाचे आयोजन... माता रमाई यांचे जीवन महिलांसाठी प्रेरणादायी - किरण देरकर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: निंबाळा येथे माता रमाई जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त स्नेहमिलन व अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला. एकविरा महिला बॅंकेच्या अध्यक्षा किरण देरकर व बालरोग तज्ज्ञ डॉ. सपना कलोदे हे यावेळी प्रमुख मार्गदर्शक होते.

सर्वप्रथम रमाई जयंती निमित्त मान्यवरांच्या हस्ते माता रमाईच्या तैलचित्राला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गावक-यांद्वारा अभिवादन रॅली काढण्यात आली. दरम्यान सत्यशोधक समाजसुधारक सिताराम आसेकर यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमा दरम्यान निंबाळा येथील येथील आशा वर्कर व सरपंच यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. सपना कलोदे यांनी उपस्थित महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमात पं. स.च्या माजी उपसभापती वृषाली प्रवीण खानझोडे, सविता ढेंगळे, वैशाली देठे, सुरेखा ढेंगळे, संगिता डाहुले, रुपाली पचारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

माता रमाई यांचे जीवन महिलांसाठी प्रेरणादायी – किरण देरकर
बाबासाहेबांच्या लढाईत रामाईंचे मोठे योगदान आहे. ज्या वेळी बाबासाहेबांना कठीण परिस्थितीत कोणी साथ देत नव्हते, त्या वेळी रमाई यांनी बाबासाहेबांची साथ कधीच सोडली नाही. पुढे डॉ. बाबासाहेबांनी भारतीय महिलांना समान हक्क मिळवून देण्यासाठी कायम प्रयत्न केले. जिजाऊ, रमाई, सावित्रीमाई यांच्या कार्यापासून आज महिला प्रेरणा घेत आहेत. त्यांच्या लढ्यामुळे अनेक महिला आज घडत आहे. अशा आदर्श महिलांचे विचार अंगिकारणे हिच महिलांच्या प्रगतीचा मार्ग आहे.
– किरण देरकर, सामाजिक कार्यकर्त्या

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वृशाली खानझोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनीता चिडे, सविता बिलबिले, मीरा मेश्राम, मंगला दूधकोहळे, सविता लसंते, सविता आसेकर, गीता आसेकर यांच्यासह गावातील बचत गटाच्या महिलांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

Comments are closed.