मारेगाव नगराध्यक्ष पदाची चुरस वाढली, काँग्रेसचा बहुमताचा दावा

अध्यक्षपदासाठी काँग्रेस, शिवसेना व भाजपचे अर्ज... सेनेला वगळून सत्ता स्थापनेचा काँग्रेसचा प्रयत्न, मनसे ठरतोय किंगमेकर

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी तीन अर्ज दाखल करण्यात आले. यात काँग्रेस पक्षाकडून नंदेश्वर खुशालराव आसुटकर, शिवसेनेकडून मनीष तुळशीराम मस्की तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने हर्षा अनुप महाकुलकर यांनी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसने या निवडणुकीत अपक्षाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान काँग्रेसने सेना वगळून सत्ता स्थापनेसाठी हालचाल सुरू केली आहे. तर दुसरीकडे सत्ता स्थापनेसाठी मनसे हा किंग मेकर ठरला आहे. ज्या पक्षाला मनसे पाठिंबा देईल त्याची सत्ता बनण्याची चिन्ह आहे.

मारेगाव नगरपंचायतवर कोणाची सत्ता स्थापन होईल हे जरी गुलदस्त्यात असले तरी सध्याच्या घडामोडी पाहता येथे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. अध्यक्षपदासाठी असलेल्या नावावर एकमत न झाल्याने व दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी अध्यक्षपदासाठी आपापली दावेदारी रेटून धरली. त्यामुळे येथे आघाडी पूर्णत्वास येऊ शकणार नाही असे म्हटले जात आहे.

काँग्रेसचा बहुमताचा दावा
काँग्रेसच्या 5 जागा व एक अपक्ष धरून काँग्रेसकडे सध्या 6 संख्येचे बळ आहे. त्यांना आणखी तीन नगरसेवकांचा पाठिंबा हवा आहे. दरम्यान मनसेच्या 2 नगरसेवकांना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 1 नगरसेवकांना सोबत घेऊन काँग्रेसने बहुमताचा 9 हा आकडा गाठल्याचा एका ज्येष्ठ नेत्यांने दावा केला आहे.

शिवसेनेला दूर ठेवण्याचा प्रयत्न, मनसे किंगमेकर
वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलेला असतानाही काँग्रेस सत्तेपासून शिवसेनेला दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सेनेने सत्ता स्थापनेसाठी भाजपसोबत युती केली तरीही त्यांना बहुमताचा आकडा गाठता येत नाहीये. त्यामुळे सर्व लक्ष आता मनसेच्या भूमिकेकडे लागले आहे.

सध्याच्या परिस्थितीचा विचार करता केवळ एका सभासदाच्या मतावर येथील नगरपंचायतचे समीकरण बदलू शकते. त्यामुळे सदस्य पळवापळवी किंवा देवदर्शन यासारख्या पर्यायांचा विचार होऊ शकतो. सध्या काही नगरसेवक हे बाहेर गेले असल्याचेही कळलेले आहे. त्यामुळे नगरपंचायतचे समीकरण कोणते रूप धारण करते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

झरीत होऊ शकतो परिणाम
झरी नगरपंचायतीमध्ये देखील कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. तिथे काँग्रेस आणि सेनेला प्रत्येकी 5 जागा तर जंगम दलाला 4 जागा मिळाल्या आहे तर इतरांना 3 जागा मिळाल्या आहे. जर मारेगाव येथे काँग्रेसने सेनेला वगळून सत्ता स्थापनेचा प्रयत्न केल्यास त्याचा परिणाम झरी नगर पंचायतीच्या निवडणुकीवर होऊ शकतो. तिथे इतर पक्षाशी युती करून सेना काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवून हा वचपा काढू शकते. 

हे देखील वाचा: 

वणीच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण मोहीम व सर्वात मोठी पाणीटंचाई

 

Comments are closed.