बहुगुणी डेस्क, वणी: खास हरियाणाहून लाईव्ह हनुमान आल्याची चर्चा कानोकानी पसरली. रामभजनात तल्लीन होऊन नाचणाऱ्या महाकाय हनुमानाचं दर्शन घ्यायला सगळे वणीकर रस्त्यारस्त्यांवर आलेत. वणीतील प्रभू श्रीराम नवमी उत्सव शोभायात्रा समितीने यावर्षीदेखील रामनवमीला रविवारी आकर्षक आणि भव्य शोभायात्रा काढली. या शोभायात्रेने आबालवृद्धांना भुरळ घातली. दरवर्षी काहीतरी नवीन आणि हटके हे या शोभायात्रेचं वैशिष्य. याहीवर्षी विविधांगी देखाव्यांनी या शोभायात्रेची शान वाढली.
रविवार दिनांक 6 एप्रिलला जुन्या स्टेट बँकेजवळील राम मंदिर येथे संध्याकाळी प्रभू श्रीरामांच्या रामरथाचे पूजन झाले. तिथूनच शोभायात्रेला सुरुवात झाली. अनेक वर्षांपासून वणीमध्ये ही परंपरा कायम आहे. प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त वणी येथे रामरथ काढला जातो. दरवर्षी काहीतरी नवीन आकर्षण ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो. यावर्षी बजरंग बली हे शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण आहे, अशी माहिती प्रभू श्रीराम नवमी उत्सव शोभायात्रा समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांनी दिली.
हरियाणातील अवाढव्य हनुमानासोबत अफलातून नृत्य करणाऱ्या छोट्याशा वानराने सर्वांचे लक्ष वेधले. अयोध्येतील रामलल्लांची देखणी मूर्ती सर्वांना मोहित करणारी अशीच होती. श्रीकृष्णाच्या क्रीडांनी या शोभायात्रेत रंग भरला. भगवान शंकर आणि हनुमानाच्या मूर्ती विशेष मनोवेधक होत्या. तसेच वणीकरांना भजनांनी मंत्रमुग्ध करण्यासाठी शेगावच्या श्री गजानन महाराज देवस्थानच्या भजन मंडळी सिद्ध होती. यांसह विविध ठिकाणांहून आलेल्या भजनी मंडळींनी आपली सेवा सादर केल्यात.
याशिवाय, रामरथ आणि रामपालखी डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. घोडे, विविध बँड पथके अशा विविध पालख्यांसह ही शोभायात्रा निघाली. संपूर्ण वणी शहर भगवामय झाले. चौका-चौकांत रांगोळ्यांनी सजावट केली होती. ठिकठिकाणी वणीकरांनी शोयात्रेतील सहभागींसाठी पिण्याचे पाणी, शीतपेय, सरबत, न्याहारीची व्यवस्था केली होती.
ही शोभायात्रा राम मंदिर (जुनी स्टेट बँक) येथून सुरू झाली. श्याम टॉकीज चौक, काळाराम मंदिर मार्ग, श्री रंगनाथ स्वामी मंदिर चौक, भगतेेसिंग चौक, गाडगेबाबा चौक, सर्वोदय चौक, टागोर चौक, तुटी कमान, गांधी चौक, खाती चौक, टिळक चौक, आंबेडकर चौकमार्गे पुन्हा राम मंदिराकडे निघाली. यात वणीकरांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
Comments are closed.