खुमासदार राजकीय टोलेबाजीत रंगला पतसंस्थेचा शाखा उद्घाटन सोहळा

शहरातील धुरंधर नेते एका व्यासपिठावर.... एकापेक्षा एक फटकेबाजीने जिंकली उपस्थितांचे मन.... सहकार क्षेत्र टिकणे गरजेचं: डॉ. नितीन राऊत, उर्जामंत्री

0

जब्बार चीनी, वणी: रविवारी दुपारी वणीत रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्थेच्या ग्रामीण शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला. या निमित्ताने परिसरातील सर्व आजी माजी राजकीय धुरंधर एका व्यासपिठावर आले होते. असा प्रसंग क्वचितच येतो. त्यामुळे या कार्यक्रमात कोण काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सध्या कोरोना व लॉकडाऊनच्या काळात आरोप प्रत्यारोपाने राजकीय वातावरण ‘टाईट’ असताना सोहळ्यात मान्यवरांचा हजरजबाबीपणा, राजकीय फुरकीमुळे खेळीमेळीच्या वातावरणात हा सोहळा पार पडला. नेत्यांच्या एकापेक्षा एक फटकेबाजीने उपस्थितांची मने जिंकली. दरम्यान कोरोना संकटाच्या काळात राज्याची आर्थिक घडी सावरण्यासाठी सहकार क्षेत्रानेच मोठा हातभार लावला. त्यामुळे सहकार क्षेत्र शाबुत राहिलं पाहिजे. असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले. 

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या ग्रामीण शाखेचे रविवारी दिनांक 1 ऑगस्ट रोजी राम शेवाळकर परिसर येथे उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार विश्वास नांदेकर, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, राजूदास जाधव, टीकाराम कोंगरे, संजय देरकर, वसंतराव घुईखेडकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. विविध पक्षाचे बडे राजकीय नेते इतक्या मोठ्या संख्येने एकत्र आल्याने सोहळ्यातील राजकीय टोलेबाजींनी कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली. 

कार्यक्रमाच्या सुरवातीलाच पतसंस्थेचे अध्यक्ष व स्वागताध्यक्ष असलेले ऍड देविदास काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. 32 वर्षांपूर्वी एका 10 बाय 10 च्या खोलीतून सुरू झालेल्या पतसंस्थेचा सुरू झालेला प्रवास त्यांनी उलगडून सांगितला. आज पतसंस्थेच्या 15 शाखा व दोन स्वत:च्या मालकीच्या इमारतीही उभ्या केल्या, मात्र हे सर्व करताना आम्ही आमच्या राजकीय विरोधकांना देखील आमच्याच विरोधात निवडणूक लढण्या करिताही कर्ज दिल्याचा उल्लेख करताच कार्यक्रमस्थळी एकच हशा पिकला. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनाही आम्ही निवडणुकीत मदत केल्याचा उल्लेख काळे यांनी केला.

त्यावर उत्तर देताना आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार म्हणाले की काळे साहेबांनी आम्हाला इलेक्शनमध्ये मदत केली हे उघडपणे सांगायला नको. वसंत जिनिंगची जागा त्यांनी विकत घेतली व त्याच पैशातून मी निवडणूक लढलो व निवडूनही आलो. भैय्यासाहेब पाम्पट्टीवार यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून काळे साहेबांना निवडले आणि त्यांनी ते काम चोख बजावले. आता काळेसाहेबांचा कार्यकाळ आणि वयही जवळपास (कामाचे) पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता काळे साहेबांनीही आपला उत्तराधिकारी लवकरात लवकर शोधावा व त्यात आमचाही थोडाबहुत विचार करावा असा टोला लगावताच सभागृत हास्याचे कारंजे उडाले.

कायम गंभीर असणारे खासदार बाळू धानोरकर यांनी देखील ही टोलेबाजी पुढे नेली. खासदारकीच्या निवडणुकीत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे देखील मला मोठे सहकार्य लाभले अशी फिरकी घेताच सर्व उपस्थितांनी त्यांना खळखळून दाद दिली. आता हे बोलू नये पण यामुळे आमदार साहेब किती खूश आहे ते मला माहिती आहे. नेहमीच्या उठसुठ मिटिंगसाठी इथे जा करणे यामुळे ते चांगलेच वैतागले होते. मात्र मी निवडून आल्याने आमदार साहेबांची झंझट कमी झाली आहे. याच आनंद त्यांच्या चेह-यावर दिसतो, असे म्हणत त्यांनी एकाच वेळी आमदार आणि माजी खासदार हंसराज अहिर यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

या संपूर्ण फटकेबाजीत उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत हे देखील यात मागे राहिले नाही. बाळू धानोरकर हे खासदार झाले आहेत. बाळूभाऊ म्हणजे एक ‘टॉनिक’च आहे. टॉनिक म्हणजे तुम्ही काही चुकीचा अर्थ काढू नका तर टॉनिक म्हणजे उर्जा आहे. अशी फटकेबाजी करताच सभागृहात हशा पिकला. मी जरी उर्जामंत्री असलो तरी खरी उर्जा ही बाळू धानोरकर आहे. मी जरी उर्जामंत्री असल्याने सर्वानाच ऊर्जा देण्याचं काम करतो. मात्र या भागात खरी उर्जा देण्याचं काम बाळू धानोरकर करतात असेही ते म्हणाले.

माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी बोलताना ऍड देविदास काळे हे वकील असल्याने कुणी लोन फेडलं नाही तर त्यांना लगेच कायदेशीर नोटीस पाठवतात. ते वकील असल्याने ग्राहकही लोन तत्परतेने फेडतात अशी कोपरखळी काढली. तर माजी आमदार वामनराव कासावार यांनी देविदास काळे यांच्या दूरदृष्टीमुळे एका छोट्या पतसंस्थेचा आज वटवृक्ष झाल्याचा उल्लेख करत पतसंस्थेच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. इतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त करीत पतसंस्थेच्या संचालक मंडळाला सदिच्छा दिल्या.

आरोग्य सेवेसाठी सरकारची तिजोरी खुली: नितीन राऊत
उद्घाटनपर भाषणात बोलताना उर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले की महाविकास आघाडी सरकार स्थापन होताच एका पाठोपाठ एक राज्यावर संकटं आलीत. आधी कोरोना नंतर चक्रीवादळ व आता पूरपरिस्थिती या मात्र परिस्थितीतही महाविकास आघाडी धैर्याने लढा देत आहे. जरी महाविकास आघाडीने या काळात कोणते मोठे विकासकार्य केले नसले तरी लोकांचे जीव वाचवण्यासाठी आरोग्यविभागासाठी सरकारने तिजोरी खुली केली असल्याचे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की कोरोना काळात राज्याची आर्थिक स्थिती धासळताना सहकार क्षेत्रानेच आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी मोठा हातभार लावला आहे. त्यामुळे सहकार क्षेत्र शाबुत राहिलं पाहिजे. मात्र राज्याचा कणा असलेल्या या क्षेत्रावरही आता केंद्राची वक्रदृष्टी पडली आहे. असे म्हणत त्यांनी मोदी सरकारच्या नवीन सहकारी क्षेत्रातील धोरणावर टीकास्त्र सोडलं व सहकारी संस्था टिकल्या पाहिजे असे प्रतिपादन नितीन राऊत यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघश्याम तांबेकर यांनी मानले. या उद्घाटन समारंभाला पतसंस्थेचे संपूर्ण संचालक मंडळ, शहरातील मान्यवर व्यक्ती, सभासदांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.