बहुगुणी डेस्क, वणी: पत्रकार रवि ढुमणे आत्महत्या प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. रवि ढुमणे यांनी लिहिलेली सुसाईड नोट आता समोर आली असून यात वणीतील विक्की नामक एका सुप्रसिद्ध व्यावसायिकाचे नाव नोटमध्ये आले आहे. या व्यावसायिकाने शेतीच्या संदर्भात आर्थिक फसवणूक केल्याने आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख सुसाईड नोट आहे. या प्रकरणी रवि ढुमणे यांचा मुलगा नयन यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या व्यावसायिकांसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
सुसाईड नोटनुसार, रवि ढुमणे यांच्याकडे शेती होती. सदर शेती त्यांना विकायची होती. दरम्यान त्यांनी त्यांच्या चांगल्या परिचयातील वणीतील एका व्यावसायिकाशी याबाबत तोंडी व्यवहार केला. या शेतीवर लोन मंजूर झाल्यावर शेतीची विक्री करू असे त्यांनी रवि ढुमणे यांना सांगितले. त्यानंतर या शेतीवर लोन उचलण्यात आले. मात्र आज सौदा करू उद्या करू असे करत पुढे शेतीचा सौदा झालाच नाही.
या शेतीवर लोन उचलण्यात आले होते. या जमिनीवर बोझा चढला असल्याने सदर शेती रवि ढुमणे यांना दुस-यांना विकता येत नव्हती. दरम्यान त्यांना बँकेचे सतत फोन व नोटीस येत होती. झालेली आर्थिक फसवणूक व त्यातून झालेले कर्ज यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते. त्यातच बँकेचे फोन व नोटीस यामुळे मुळे ते त्रस्त झाले होते. त्या मानसिक त्रासातून त्यांनी आत्महत्या करीत असल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
शेतीवर रवि ढुमणे यांच्या पत्नीच्या नावे एका अर्बन बँकेच्या गडचांदूर शाखेतून मोठे कर्ज घेण्यात आले आहे. हे कर्ज शेतीच्या किमतीपेक्षाही अधिक आहे. तसेच हे कर्ज काढण्यासाठी रवि ढुमणे व त्यांच्या पत्नी कधीही बँकेत गेले नव्हते. बँकेत न जाता त्यांच्या नावे कर्ज मंजूर कसे झाले? असा आरोप रवि ढुमणे यांच्या मुलगा नयन ढुमणे याने केला आहे. व्यावसायिक व त्यांचे चार साथीदार यांनी संगनमत करून त्यांच्या शेतीवर कर्ज उचलले. या आर्थिक फसवणुकीतून त्यांच्या वडीलांनी आत्महत्या केली, असा आरोप नयन यांनी करत या पाचही जणांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
पत्रकार रवि ढुमणे (55) रा. विद्यानगरी वणी यांनी दिनांक 15 डिसेंबर रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रवि ढुमणे यांनी आत्महत्येआधी एका डायरीत सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यातून शेतीचे प्रकरण बाहेर आले आहे. आत्महत्ये प्रकरणी पुढे काय कार्यवाही होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Comments are closed.