आदेशाची पायमल्ली करीत परप्रांतीय कामगारांची भरती
सिमेंट कंपनीने शासनाचे कोरोनासंबंधीत नियम बसवले धाब्यावर
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे आशियातील सर्वात मोठी मानली जाणारी सिमेंट फॅक्टरीचे काम सुरू आहे. कोरोना मुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोनाच्या दहशतीमुळे परप्रांतीय मजूर आपल्या गावी परत गेले. मुकुटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट कंपनीतीलही दोन ते अडीच हजार कामगार सुद्धा आपापल्या राज्यात निघून गेले होते.
शासनाने लॉकडाऊन मध्ये शिथिलता देऊन राज्यातील कारखाने, दुकाने, बाजारपेठ यांना सशर्त परवानगी दिली. याच अनुषंगाने आरसीसीपीएल सिमेंट कंपनीने जिल्हाधिकारी यांच्याकडे कंपनीत काम करण्याकरिता चंद्रपूर गडचिरोली व रायगड जिल्यातील कामगार (मनुष्यबळ) रुजू करण्याची परवानगी मागितली होती. जिल्हाधिकारी यांनी १ जून रोजी पत्र क्र ४८७ नुसार सशर्थ परवानगी दिली.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात ज्या जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी किंवा कामगार आणायचे आहे त्यांची त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांची ई पास द्वारे मंजुरी घेणे आवश्यक आहे, ज्या जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी किंवा कामगार येणार आहे ते कोणत्याही प्रतिबंधित क्षेत्रात किंवा हॉटस्पॉट क्षेत्रात गेलेला नसावा किंवा त्या क्षेत्रातील नसावे तसेच कोविड १९ पोजिटिव्ह नसावे किंवा पोजिटिव्ह रुग्णाच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्कात आलेला नसावे.
ज्या जिल्ह्यातून मनुष्यबळ (कामगार) कंपणीच्या वाहनाने आणायचे असतील त्या वाहनांची परवानगी ई पासद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयातुन घेणे तसेच वाहन चालकाची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे व वाहनसुद्धा निर्जंतुकरन करनेसुद्धा आवश्यक आहे. परवानगी घेऊन बाहेर जिल्ह्यातील मजूर आणल्यास त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना ILI, sari चे लक्षण नसल्याची खात्री करणे, कामगारांची वैद्यकीय तपासणी नंतर त्यांना कोरोना विषाणूचे लक्षण आढळल्यास तालुका वैद्यकीय अधिकारी किंवा तहसीलदार यांना माहिती द्यावे.
त्या मजुरांना १४ दिवस गृह विलगिकरन करणे बंधनकारक आहे. १४ दिवस गृह विलगिकरण केल्यानंतर एकही मजूर कंपनीच्या बाहेर फिरणार नाही, कुणाच्या संपर्कात येणार नाही,एकाच ठिकाणी गर्दी करणार नाही याची दक्षता कंपनी व्यवस्थपकाने घ्यावी. विलगीकरन केलेल्या मजुरांचे तपासणी करून करून तालुका स्तरीयसमितीसमोर अहवाल सादर करावे.
बाहेर जिल्ह्यातून आलेल्या कामगारांचे थर्मल स्क्रिनिंग करावे,कंपनी व्यवस्थापक यांनी ५० वर्षावरील व व्याधीग्रस्त कामगार कंपनीत येणार नाही याची दक्षता घ्यावी, कंपनीतील प्रत्येक व्यक्ती तसेच बाहेर जिल्ह्यातील कामगारांनी चेहऱ्यावर मास्क लावल्याचे खात्री करावी, बाहेर जिल्ह्यातील कामगारांनी नेहमी सैनिटायझर चा वापर करावे व कामगाराकरिता ते कंपनीचे व्यवस्थापक यांनी उपलब्ध करून द्यावे,
कर्मचारी अधिकारी व कामगार यांच्या नियमित तपासणी करीता कंपनीने थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सीमीटर उपलब्ध करून द्यावे या अटीवर विद्यमान जिल्हाधिकारी यांनी आरिसीपीएल सिमेंट कंपनीला वरील तीन जिल्यातील कामगार आणण्याची परवानगी दिली होती.
आरसीसीपीएल सिमेंट कंपनीने जिल्हाधिकारी यांची दिशाभूल व त्यांच्या आदेशाची पायमल्ली करीत गडचिरोली चंद्रपूर व रायगड जिल्ह्यातील मजुरां ऐवजी उत्तरप्रदेश मध्यप्रदेश व इतर राज्यातील मजूर आणले. त्यातील कोरोनाचे तीन रुग्ण मिळाल्याने निष्पन्न झाले. परप्रांतीय कामगारामुळे सिमेंट कंपनीत कोरोनाचे तीन रुग्ण आढळले ज्यामुळे मुकुटबन ग्रामवासियात दहशत निर्माण झाली आहे.
सिमेंट कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे उत्तरप्रदेश येथील कोरोना पोजिटिव्ह कामगार आल्याने मुकुटबन मध्ये रुग्णाला सुरवात झाली. सदर कंपनीने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करून परप्रांतीय मजुरांचा भरणा केल्याने त्यांच्यावर कार्यवाही होणार का असा संतप्त प्रश्न ग्रामवासी करीत आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी कंपनीतील कामगार करिता दिलेल्या सूचनांचे पालन होत आहे की नाही ही तपासणी करणे सुद्धा गरजेचे झाले आहे.