मुकुटबन येथील कुख्यात रेती तस्करावर महसूल विभागाची कार्यवाही

अवैधरीत्या रेतीची वाहतूक करताना ट्रॅक्टर जप्त, 1लाख 20 हजारांचा दंड

जितेंद्र कोठारी,  झरी: अवैधरीत्या रेतीची वाहतूक करताना एक ट्रॅक्टर झरी येथील महसूल अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री 12 वाजता मुकुटबन येथे पकडला. मुकुटबन पोलीस ठाण्याच्या अगदी समोर करण्यात आलेल्या या कार्यवाहीत 1 ब्रास रेती व ट्रॉलीसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर मुकुटबन पोलिस ठाण्यात उभा करण्यात आला असून रेती तस्करावर 1 लाख 20 हजाराचे दंड ठोठावण्यात आल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार मुकुटबन येथील कुख्यात रेती तस्कर सय्यद आसिफ हा मागील अनेक वर्षांपासून रेती तस्करीच्या व्यवसायात गुंतून आहे. आसिफ हा पैनगंगा नदीसह तालुक्यातील लहान मोठ्या नाल्यातून अहोरात्र रेती उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे मुकुटबन, अडेगाव, मांगली, अर्धवन, मार्की व इतर गावात चोरट्या मार्गाने विक्री करत असतो. रेती तस्करीच्या धंद्यात एकछत्र राज्य करण्याची मंशा आसिफची होती.

मंगळवार 16 नोव्हेंबरला झरी येथील नायब तहसीलदार महेश रामगुंडे यांना नेरड येथील नाल्यातून रेती तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीवरून नायब तहसीलदार महेश रामगुंडे यांनी झरीचे मंडळ अधिकारी उल्हास निमेकर, मुकुटबनचे मंडल अधिकारी बाबूसिंग राठोड, माथार्जुन क्षेत्रचे मंडळ अधिकारी ऋषी राऊत यांना सोबत घेऊन वणी मार्गावरील सितारा बारजवळ सापळा रचला.

रात्री 12.15 वाजता दरम्यान वणी मार्गावरून येणाऱ्या एक ट्रॅक्टरला थांबविण्याचा प्रयत्न महसूल अधिकाऱ्यांनी केला. मात्र ट्रॅक्टर चालकाने भरधाव वेगाने ट्रॅक्टर पळवला. महसूल अधिकाऱ्यांनी ताबडतोब पाठलाग करून पोलीस स्टेशनसमोर रेती भरलेला ट्रॅक्टर अडविला.

ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरुन असलेल्या रेतीच्या रॉयल्टी व वाहतूक परवानाबाबत ट्रॅक्टर चालकाला विचारणा केली असता काहीही नसल्याचे सांगितले. कार्यवाही सुरु असतानाच रेती तस्कर सैयद आसिफ सैयद अजीज रा. मुकुटबन तिथे आला व महसूल अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला.

मात्र महसूल पथकाने आमिषाला बळी न पडता रेती तस्कर सैयद आसिफ सैयद अजीज विरुद्द पंचनामा तयार करून 1 ब्रास रेती भरलेले ट्रॅक्टर मुकुटबन पोलिसांच्या संरक्षणात पोलीस ठाण्यात लावले. सदर गुन्ह्याबाबत रेती तस्करावर 1 लाख 20 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

रेती तस्करांवर पोलिसांची मेहर नजर?

मागील एका वर्षात मुकुटबन पोलिसांनी वणी, घुग्गुस, पिंपलखुटी, छत्तीसगड येथून चोरट्या मार्गाने येणाऱ्या अनेक रेती वाहनावर कार्यवाही केली. मात्र मुकुटबन येथील रेती तस्कर आसिफच्या वाहनावर आजपावेतो कधीही कार्यवाही करण्यात आली नाही. पोलिस व तलाठ्याच्या नजरेसमोरून दिवसरात्र रेती तस्करी करणाऱ्या आसिफची धमकी देण्याइतकी हिम्मत वाढली आहे. महसूल अधिकाऱ्याच्या या कारवाईमुळे मुकुटबन परिसरात रेती तस्करीवर आळा बसणार असे बोलले जाते.

Comments are closed.