रस्त्यावरील खड्ड्यात पडून निळापूरचा युवक गंभीर जखमी
निळापूर-बामणी मार्गावरील खड्डे बनताहेत अपघातांचे कारण
पुरुषोत्तम नवघरे , वणी: निळापूर-बामणी हा अत्यंत रहदारीचा मार्ग. दिवस-रात्र या मार्गावर अविरत वाहतूक असते. मात्र या रोडवरील मोठमोठाल्या खड्ड्यांमुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांचा जीव सदैव टांगणीला लागलेला असतो. कधी कुणाचा आणि कसा अपघात होईल, हे सांगता येत नाही. रात्री नऊच्या सुमारास जाणाऱ्या निळापूर येथील युवक आशीष दिलीप ढवस याचाही असाच अपघात झाला. आपलं काम उरकून आशीष गावाकडे टू व्हीलरने परत जात होता. त्या रस्त्याचा अंदाज असल्यामुळे तो सावधगिरीनेच आपली गाडी चालवत होता. तरीही रस्त्यावरील खड्ड्यात त्याची गाडी गेल्याने तोल गेला. तो जागेवरच पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्याला लगेच वणीतल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे त्याला नागपूरला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले.
निळापुर-ब्राह्मणी या रस्त्याने मोठमोठे खड्डे पडलेले असून या खड्ड्यामुळे वारंवार अपघात होतात. तेव्हा त्वरित हे खड्डे बुजवून देण्याची मागणी शिवसेना उपतालुकाप्रमुख (उ.बा.ठा.) मनोज ढेंगळे यांनी तीन महिन्या अगोदर सार्वजनिक बांधकाम विभाग वणी आणि वेकोली कडे केली होती. परंतु संबंधित विभागांनी तत्परता न दाखवल्याने या रस्त्याने वारंवार अपघात होतच आहेत. निळापूर जवळच्या त्या भल्या मोठ्या खड्ड्यामुळे हा तिसरा अपघात झालेला आहे.
त्याच खड्ड्यात बसून आंदोलन करू
या रस्त्याने मोठमोठे खड्डे पडलेत. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांचे गंभीर अपघात होत आहेत. पीडब्ल्यूडी आणि वेकोलिला तीन महिन्यांपूर्वीच तसे निवेदन दिले होते. वारंवार भेटीगाठी घेऊन पाठपुरावा केला. आमचा रोष शांत करण्यासाठी कोलेरा आणि गोवारी फाट्याजवळील लहान खड्डे बुजवण्यात आलेत. परंतु ज्या खड्ड्यामुळे अपघात होत आहेत, ते जैसे थे परिस्थितीतच आहे. या तरुणाच्या आरोग्याचे अधिक नुकसान झाल्यास लगेच दुसऱ्या दिवसापासून गावकऱ्यांना घेऊन त्याच खड्ड्यात बसून रस्ता अडवून धरणे आंदोलन करू.
मनोज ढेंगळे
शिवसेना उपतालुकाप्रमुख (उ.बा.ठा.)
Comments are closed.