प्रवास धोकादायक…! पाटाळा येथील नवीन पुलावर पडले खड्डे

जितेंद्र कोठारी, वणी : वणी ते वरोरा, नागपूर जाणाऱ्या प्रवाश्यांना वणी ते वरोरा पर्यंत नव्याने बांधण्यात आलेल्या चौपदरी रस्त्यावर प्रवास सुखकर झाला आहे. मात्र वर्धा नदीच्या पाटाळा येथील पुलावर एका महिन्यातच खड्डे आणि भेगा पडल्याने या मार्गावर प्रवास धोक्याचे ठरत आहे. नुकतेच वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या या पुलावर अनेक ठिकाणी पडलेल्या खड्डे आणि भेगा बुजविण्याचे थातुरमातुर कार्य कंत्राटदाराने सुरु केला आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआई) तर्फे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 वर वणी ते वरोरा दरम्यान रस्ता चौपदरीकरणाचे कार्य अग्रवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कडून करण्यात आले. या मार्गावर वर्धा नदीवर 60 वर्ष जुना पुल अरुंद आणि जीर्ण झाल्याने त्याठिकाणी जास्त उंचीचा नवीन पुल बांधण्यात आला. नवीन पुल वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर जुना पुल नामशेष करण्यात आला. मात्र मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पुलावरील डांबरी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे व भेगा पडल्या आहेत. 

कोट्यावधीच्या निधीतून बांधण्यात आलेल्या वर्धा नदीच्या पुलावर काही दिवसातच खड्डे पडणे हे निश्चितच गंभीर बाब आहे. या मार्गावर दररोज हजारो वाहन आवागमन करतात. शिवाय वणीकरांना नागपूरला जाण्यासाठी हा एकमात्र रस्ता आहे. हल्ली वर्धा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे काही अप्रिय घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

Comments are closed.