दरोडा टाकण्याचा डाव पोलिसांनी उधळला, जंगली पीर जवळ मध्यरात्री थरार

जितेंद्र कोठारी, वणी: जंगली पीर परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना वणी पोलिसांनी शिताफीने चार जणांना अटक केली तर दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले. संतोष उर्फ डोमा दिलीप मेश्राम (33), शेख शाहरुख शेख सलीम (22), शेख इरफान शेख सलीम (24), अनिल विनायक येमूलवार ( 22) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर दोघं फरार झाले. वणी पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री ही धाडसी कारवाई केली. आरोपींकडून धारदार चाकू व नायलॉन दोरी जप्त करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की ठाणेदार प्रदीप शिरस्कर हे गुरूवारी दिनांक 18 मे रोजी रात्री उशिरा त्यांच्या साथीदारांसह पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान रात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास त्यांना खबरीकडून जत्रा मैदान रोडवरील जंगली पीर दर्ग्या जवळ काही इसम जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पेट्रोलिंग पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

घटनास्थळी त्यांना काही इसम अंधाराचा फायदा घेऊन दबा धरून बसल्याचे आढळले. पोलिसांचे पथक जवळ जाताच त्यांनी तिथून पोबारा केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता काही अंतरावर 4 जण पोलिसांच्या ताब्यात आले तर दोघे जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यांच्याजवळ एक धारदार लोखंडी चाकू व एक पाच फुटांची नॉयलान दोरी आढळून आली.

हे सर्व आरोपी वणी शहरातील खरबडा मोहल्ला येथील असून दरोडा टाकण्याचा तयारीने संगनमत करून बसले होते. त्यामुळे सहा. पोलिस निरीक्षक दत्ता ओमप्रकाश पेंडकर यांच्या फिर्यादीवरून अटकेतील व फरार आरोपी विरुद्ध 399 भादवी व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

Comments are closed.