गुरुवारी होणार निंबाळ्याजवळ रुद्राक्ष बन उद्यानाचे भूमिपूजन

निसर्गरम्य ठिकाणी विकसीत होणार पर्यटन केंद्र, बालोद्यान

बहुगुणी डेस्क, वणी: वणी व परिसरात मोठ्या प्रमाणात निसर्गसंपदा आहे. हा परिसर पर्यटन केंद्र म्हणून विकसीत करण्यासाठी निबाळ जवळ रुद्राक्ष बन हे उद्यान तयार करण्यात येणार आहे. गुरुवारी दिनांक 7 मार्च रोजी दुपारी 2 वाजता या कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे. वणी येथे मागील महिन्यात पार पडलेल्या शिवपुराण कथा कार्यक्रमात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वणी जवळ शिवबन तयार करण्याची घोषणा केली होती. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या पाठपुराव्यातून हे पर्यटन केंद्र तयार होणार आहे.

महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ, नागपूर यांच्या प्रस्तावानुसार वणीजवळील निंबाळा (रोड) येथील वनविभागामध्ये वन मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी वणीकरांना दिलेल्या शब्दानुसार रुद्राक्ष वन ( शिवबन) उद्यान साकारणार आहे. या प्रस्तावाला शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासह सार्वजनिक बांधकाम विभाग प्रादेशिक विभाग अमरावती यांनीही तांत्रिक सहमती दिली आहे.

काय राहणार रुद्राक्ष बनात?
वणी शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या निंबाळा येथे प्रस्तावित रुद्राक्ष वन तयार केले जाणार आहे. यासाठी 11 कोटी 97 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या उद्यानात रुद्राक्ष वनस्पतीसह, बेल व इतर बहुउपयोगी वनस्पती, फुलझाडे लावून सौंदयीकरण केले जाणार आहे. या सोबतच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन केंद्र, बालोद्यान, विकसीत केले जाणार आहे.

या रुद्राक्ष वनामुळे परिसरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. या परिसरातील नागरिकांना पर्यटनासाठी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या पाठपुराव्यातून ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे एक मोठे केंद्र निर्माण होणार आहे. अशी माहिती चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे विस्तारक रवी बेलूरकर यांनी माहिती दिली आहे.

 

Comments are closed.