लेखी आश्वासनानंतर रुख्माई कोलवॉशरीच्या कामगारांचे आंदोलन स्थगीत

नियमानुसार वेतनाची मागणी मान्य, मात्र अरिअर्सबाबत कामगारांची नाराजी

निकेश जिलठे, वणी: तालुक्यातील निंबाळा येथील रुख्माई कोलवॉशरीच्या कामगारांनी नियमानुसार वेतन तसेच विविध मागणीसाठी गेटबंद आंदोलन सुरु केले होते. दुस-या दिवशी संध्याकाळी लेखी आश्वासनानंतर या आंदोलनाची सांगता झाली. कामगारांची नियमानुसार वेतनाची मागणी मान्य करण्यात आली. मात्र 3 वर्षांच्या अरिअर्सच्या मागणी ऐवजी केवळ 3 महिन्याचे अरिअर्स देण्याचे कंपनीने मान्य केले, त्यामुळे कामगारांनी नाराजी व्यक्त केली. दोन दिवस कंपनीचे गेटबंद असल्याने कंपनीसमोर 25 ते 30 वाहनांची गर्दी जमा झाली होती. वणीचे ठाणेदार अनिल बेहराणी यांनी या प्रकरणात कामगार व कंपनी व्यवस्थापनात दुवा म्हणून काम केले.

निंबाळा येथे रुख्माई कोलवॉशरी आहे. या कंपनीत कामगार पुरवण्याचे कंत्राट टेकवर्थ सोल्युशन्स सर्व्हिस या कंपनीला देण्यात आले आहे. सध्या तेथील कामगारांना परिमंडळ 3 नुसार वेतन दिले जात आहे. परंतु, कामगारांच्या मते ही कंपनी शहरापासून 20 किलोमीटरच्या आत आहे. त्यामुळे ही कंपनी परिमंडळ 2 च्या क्षेत्रात (नगरपालिका) येते. सध्या कामगारांना परिमंडळ 3 (ग्रामीण) नुसार वेतन देण्यात येत आहे. नियमानुसार परिमंडळ 2 च्या निर्धारित रेट नुसार कामगारांना वेतन मिळायला पाहिजे. अशी कामगारांची मागणी होती.

कामगारांच्या वतीने पुखराज खैरे यांनी वेळोवेळी सरकार आणि कंपनीच्या व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार केला. त्यांनी सरकारच्या किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळण्यासाठी पाठपुरावा केला. परिमंडळ 2 मधील कुशल कामगारांना विशेष भत्त्यासह 14 हजार 520, अर्धकुशल कामगारांना 13 हजार 550 रुपये आणि अकुशल कामगारांना 12 हजार 455 रुपये वेतन मिळणे गरजेचे आहे. मात्र कामगारांना अजूनही परिमंडळ 2 मधील नियमानुसार वेतन दिले जाते. त्यामुळे कामगारांचे आर्थिक नुकसान होत आहे. असा आरोप पुखराज खैरे यांनी केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

नियमानुसार वेतनासह कामगारांनी मागील 3 वर्षा पासूनचा एरियर्स देण्यात यावा, कामगारांना सुरक्षेची हमी देण्यात यावी, दिवाळी बोनस देण्यात यावा, कामगारांची वर्गवारी करून पगारवाढ देण्यात यावी, तारीख ठरवून त्या तारखेला नियमीत पगार देण्यात यावा आणि महिन्यात 26 दिवस काम देण्यात यावे, अशा मागणी कामगारांच्या होत्या. यासाठी कामगारांनी कामबंद आणि गेट बंद आंदोलन सुरू केले होते. 

कंपनीचे गेट बंद असल्याने कंपनीसमोर ट्रकची गर्दी झाली. गर्दी आणखी वाढल्यास राजूर रोडवर ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे वणीचे ठाणेदार अनिल बेहराणी हे आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी कामगार व कंपनी व्यवस्थापनामध्ये मध्यस्थी केली. कंपनीच्या वरीष्ठ अधिका-यांनी कामगारांची भेट घेत लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. कंपनीने कामगारांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या. तर 3 वर्षांच्या अरिअर्स ऐवजी केवळ 3 महिन्यांचे अरिअर्स देण्याचे कंपनीने मान्य केले. त्यामुळे कामगारांनी नाराजी व्यक्त केली.

अरिअर्स हा कामगारांचा हक्क आहे. त्यामुळे मागणीसाठी कंपनी व्यवस्थापनाशी पाठपुरावा सुरु राहील. कंपनीने ही मागणी मान्य न केल्यास यापुढेही लढा सुरु राहील, अशी माहिती पुखराज खैरे यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली.

Comments are closed.