महाजेनकोची फसवणूक झाल्याचा अरबाज अहेमद खान यांचा आरोप
रुक्मिणी कोल वॉशरीवर वणीतील पत्रकार परिषदेत ओढलेत ताशेरे
बहुगुणी डेस्क, वणी: वणीचा परिसर दगडी कोळसा आणि संबंधित पूरक उद्योगांनी समृद्ध आहे. परिसरात कोळसा स्वच्छ करणाऱ्या अनेक कोलवॉशरीज आहेत. तशीच नजिकच्या राजूर येथे रुक्मिणी कोल वॉशरी आहे. या कोलवॉशरीला महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (MAHAGENCO)चे 50 हजार टन कोल वॉशचे काम मिळाले.
मात्र रुक्मिणी कोलवॉशरीत गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप जिल्हा कॉंग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभागाचे वणी तालुका अध्यक्ष अरबाज अहेमद खान यांनी पत्रकार परिषदेत केला. ते म्हणालेत की, रुक्मिणी कोल वॉशरी येथून ‘कोल वॉश’च्या नावाखाली गोरखधंदा सुरू आहे.
कोल वॉश केल्याच्या नावावर महाजनको या कंपनीला 40% कोळसा व 60 % डस्ट हे मिश्रण दिले जात आहे. ते रेल्वे डब्यांनी महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (MAHAGENCO) या कंपनीला पाठवीत आहे. मुळात वॉश केलेला कोळसा उच्च दरात ते अन्यत्र विकत आहेत. त्यामुळे महाजनको या कंपनीची फसवणूक होत असूनही, त्यांच्या पासून 100% कोळशाचा पैसा वसूल करीत आहे. असे खान यांनी सांगितले.
या गैरप्रकारावर आळा घालावा. तसेच रुक्मिणी कोल वॉशरीच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी व्हावी. आणि त्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी खान यांनी केली. अरबाज अहेमद खान यांनी संबंधित विभाग, पोलिस विभाग यांच्याकडे तशी तक्रार दाखल केली. मात्र संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचीही आरोप त्यांनी पत्रकार परिषदेतून केला .
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सात दिवसांत कारवाई न केल्यास त्यांच्या विरोधात न्यायालयात पिटीशन दाखल करण्याचा इशाराही पत्रकार परिषदेतून अरबाज अहेमद खान यांनी दिला आहे.
Comments are closed.