पेट्रोल वाहतूकदारांचा संप अफवा: वणीत पेट्रोल भरण्यासाठी तोबा गर्दी

पेट्रोल, डिझेलचा पुरवठा नियमीत राहणार, पेट्रोल पम्प चालकाची माहिती

विवेक तोटेवार, वणी: पेट्रोल वाहतूकदारांचा 4 दिवसांचा संप पुकारला, अशी अफवा सोमवारी दुपारपासूनच वणीत पसरायला सुरुवात झाली. संध्याकाळी या अफवांनी आणखीच जोर पकडला. त्यामुळे वाहनाचालकांनी पेट्रोल पंपाच्या दिशेने धाव घेतली. मात्र तिथे गर्दी पाहून अनेकांनी वणीच्या आसपास असलेल्या पेट्रोलपम्पाकडे धाव घेतली. कुठे तुफान गर्दी, तर कुठे पेट्रोल नाही अशी पाटी दिलल्याने लोकांनी तहसील कार्यालयाजवळील पेट्रोल पम्पवर एकच गर्दी केली. लोकांनी खिशात असेल तितक्या पैशांचे इंधन भरायचे, असा संकल्पच केल्याने रात्री ही गर्दी जत्रेत बदलली. मात्र ही अफवा असून पेट्रोल नियमीत मिळणार अशी माहिती वणीतील एका पेट्रोल पम्प चालकांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली. 

4 दिवस पेट्रोल मिळणार नाही, अशी अफवा दुपारी राज्यभरात पसरली. पेट्रोलपम्पावर गर्दी अशा बातम्या मीडियातून समोर येताच ठिकठिकाणी नागरिकांनी पेट्रोल पम्पावर गर्दी करण्यास सुरुवात केली. वणीत देखील ही अफवा पसरण्यास वेळ लागला नाही. दरम्यान एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पेट्रोल विक्री झाल्याने काही पेट्रोल पम्पावर पेट्रोल नाहीच्या पाट्या पहावयास मिळाल्या. त्यामुळे शेवटी तहसील चौकात लाठीवाला पेट्रोल पंपावर पेट्रोल असल्याने या ठिकाणी लोकांनी एकच गर्दी केली.

तहसील कार्यालय चौकात ट्रॅफिक जाम
सायंकाळी गर्दी इतकी वाढली की या परिसराला जत्रेचे स्वरूप आले. या मुख्य मार्गाचे काम सुरू असल्याने एकाच बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी सुरू आहे. वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. शेवटी पोलिसांना ही कोंडी सोडवावी लागली. त्यामुळे वणीकरांची चांगलीच तारांबळ उडाली.

पेट्रोल नियमीत मिळणार
‘वणी बहुगुणी’ने याबाबत शहरातील एका पेट्रोल पम्प चालकाला संपर्क केला असता त्यांनी पेट्रोल डीलर्स असोसिएशनकडे अशी कुठलीही माहिती आली नसल्याचे स्पष्ट करत ही एक अफवा असल्याचे सांगतिले. एकाच वेळी लोकांनी गर्दी केल्याने पेट्रोल पम्प चालकाकडला नेहमीचा पेट्रोल साठा संपला. त्यामुळे काही पेट्रोल पम्पवर पेट्रोल नसल्याच्या पाट्या लागल्या. मात्र ज्यांच्याकडे स्टॉक होता त्यांनी विक्री केली. एकाच वेळी मागणी वाढल्याने ग्राहकांना याबाबत थोडा त्रास होईल मात्र पेट्रोल पम्पवर नियमीत पेट्रोल मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली.

 

Comments are closed.