सुशील ओझा, झरी: शासनाचा महसूल बुडवून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे दोन हायवा ट्रक मुकुटबन पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी ट्रकमालकासह तिघांना अटक करण्यात आली असून 72 हजारांची रेती व 40 लाखांचे ट्रक असा एकूण 40 लाख 72 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या धाडीसाठी पोलिसांना स्थानिक रेती माफियानेच टीप दिल्याची चर्चा परिसरात चांगलीच रंगत आहे.
रविवारी रात्री मुकुटबन पोलीस पेट्रोलिंग करीत असताना त्यांना कोरपना तालुक्यातील विरुर गाळेगाव येथून दोन ट्रक भरून रेती येत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास खडकी मार्गावर असताना कृषी उत्पन्न बाजार समिती समोर दोन हायवा ट्रक आले. पोलिसांनी त्यांना अडवून पाहणी केली असता त्यात प्रत्येकी 6 ब्रास रेती असल्याचे आढळले.
पोलिसांनी सदर रेती बाबत चालक मूलचंद परखडे (26) रा. मोहदा व धर्मराज कुडमेथे (45) रा मेंढोली यांना रायल्टी बाबत विचारणा केली असता दोघांनी रायल्टी नसल्याचे सांगितले. कोरपना तालुक्यायील विरुर गाळेगाव येथील नदीपत्राच्या घाटावरून ही रेती अवैधरित्या आणल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी ट्रक मालकाचे नाव विचारले असता त्यांनी निकाश आनंदराव शेंडे (30) रा मोहदा ता. वणी यांचे असल्याचे सांगितले.
मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी टाटा हायवा (MH34 BG 8548) (MH34 BG 5502) जप्त करून पोलीस ठाण्यात लावले. हायवा ट्रक मालक व चालक यांच्याविरोधात कलम 379, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकऱणी पोलिसांनी 12 ब्रास रेती किंमत 72 हजार व दोन हायवा ट्रक किंमत 40 लाख असा एकूण 40 लाख 72 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. सदर कार्यवाही ठाणेदार धर्मा सोनुनेसह पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड, जमादार प्रवीण तालकोकुलवार, अशोक नैताम, मोहन कुडमेथे, जितेश पानघाटे यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास जितेश पानघाटे करीत आहे.
रेती तस्करानेच दिली टीप?
सदर रेती भरून आलेल्या ट्रकची माहिती येथीलच एका रेती तस्कराने पोलिसांना दिल्याची चर्चा परिसरात रंगत आहे. स्वतःचा रेती चोरीचा गोरखधंदा सुरू राहावा व पोलिसांच्या गुडबुकमध्ये राहावे यासाठीच या रेती तस्कराने हा खटाटोप केल्याचे बोलले जात आहे. सदर रेती तस्कर पूर्वीपासून रेती चोरीचा व्यवसाय करीत आहे. परंतु यांच्याकडे पोलीस व महसूल विभाग दुर्लक्ष का करीत आहे? असाही प्रश्न उपस्तीत केला जात आहे.
हे देखील वाचा: