वणीत पोलिसांसाठी ताणतणाव व्यवस्थापन शिबिराला सुरुवात

पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांच्या संकल्पनेतून शिबिराचे आयोजन

0

जब्बार चीनी, वणी: 12 ते 14 तासांची ड्युटी, सण उत्सव काळातील बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त काम, कोरोना काळात पडलेला कामाचा अतिरिक्त व्याप, रजेचा अभाव, कुटुंबाला दिला जाणारा अपुरा वेळ इत्यादीमुळे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी कायमच ताण तणावात राहतात. पोलीस दलातील पोलीस अधिकारी, पोलीस अमलदार, कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ ताणतणाव विरहीत रहावे याकरीता वणीतील सिद्धीविनायक मंगल कार्यालयाच्या सभागृहात मानसिक व शारीरिक स्वास्थ शिबिराला सुरूवात झाली. पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती येथील तज्ज्ञ डॉ. शिवाजी कुचे हे या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक आहे. या शिबिरात पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सुमारे 100 शिबिरार्थी यात सहभागी झाले आहेत.

पोलिसांचे आयुष्य हे धकाधकीचे आणि धावपळीचे असते. त्यातच कोरोनासारख्या विषाणुच्या प्रकोपामुळे पोलिसांवर कामाचा अतिरिक्त भार आला. त्यामुळे पोलिसांचे मागील संपूर्ण वर्षच हे ताणतणाव आणि दगदगीत गेले. लॉकडाऊनमध्ये नागरिकांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्नशील असणा-या पोलीस विभागाच्या कर्मचा-यांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थावर लॉकडाऊने चांगलाच प्रभाव पाडला. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य नीट नसल्यास त्याचा परिणाम कार्यक्षमतेवर होतो.

ही बाब यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी ओळखली व त्यांनी पोलीस विभागाच्या कर्मचा-यांसाठी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी ताणतणाव विरहीत जीवन जगण्यासाठी कोरोना आणि फोबिया मेडिटेशन या विषयावर कार्यशाळा आयोजित केली. ही कार्यशाळा संपूर्ण जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. वणीत या शिबिराला सुरूवात झाली आहे. नामवंत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शिवाजी कुचे हे या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक आहे. आयोजीत शिबिरात डॉ. कुचे यांनी ताणतणाव व्यवस्थापन कसे करावे, काम आणि प्रकृती यांची सांगड कशी घालावी याबाबत शिबिरार्थ्यांना सूचना केल्या.

शिबिराला उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्यासह पोलिस निरिक्षक वैभव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात वणी, मारेगाव, मुकुटबन, पाटण व वाहतुक शाखेतील 100 पुरुष आणि महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यात 16 ठिकाणी होणार शिबिर – डॉ. भुजबळ
सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुबीयांची शारीरिक, बौद्धिक, मानसिक व आध्यात्मिक क्षमता अधिकाधिक विकसीत व्हावी. तसेच प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांचे वैयक्तिक आयुष्य व जीवनात ताणतणाव विरहित व सुसंवाद निर्माण व्हावा या उद्देशाने प्रा. शिवराज कोचे अमरावती यांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण जिल्ह्यात 16 ठिकाणी हे शिबिर होणार आहे. वणीपासून त्याची सुरूवात झाली आहे.
– डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा पोलिस अधिक्षक

हे देखील वाचा:

ट्रकने घेतला अचानक पेट, ट्रक जळून भस्मसात

ज्याला शेतकरी आत्महत्या समजत नाही, तो भाबडा किंवा भामटा: चंद्रकांत वानखडे

 

Leave A Reply

Your email address will not be published.