तब्बल 20 वर्षांनंतर वणीत विधानसभेत फडकला भगवा

संजय देरकर यांचा बोदकुरवारांवर 15.560 मतांनी दणदणीत विजय

तब्बल 20 वर्षांनंतर वणीत विधानसभेत फडकला भगवा

निकेश जिलठे, वणी; वणी विधानसभेत तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे संजय निळकंठ देरकर यांनी विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यावर 15 हजार 560 मतांनी दणदणीत विजय मिळवला. देरकर यांना 94,618 मतं मिळाली तर बोदकुरवार यांना 79,058 मतं मिळाली. बंडखोरी केलेल्या काँग्रेसचे संजय खाडे यांना 8 हजारांचा पल्ला देखील गाठता आला नाही. त्यांना 7,540 मते मिळाली तर मनसेचे राजू उंबरकर यांनी गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक मते मिळवत 20 हजारांचा पल्ला पार केला. त्यांना 21,977 मते मिळाली. विजयानंतर संजय देरकर समर्थक, शिवसैनिक व महाविकास आघाडीच्या समर्थकांनी टिळक चौक येथे फटाक्यांची आतषबाजी करीत व गुलाल उधळीत एकच जल्लोष केला. विजय निश्चित झाल्यानंतर  वामनराव कासावार, टिकाराम कोंगरे यांच्यासह काँग्रेस तसेच शिवसेनेच्या नेत्यांनी देरकर यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी संजय देरकर व वामनराव कासावार यांच्या गळ्यात हार टाकत दोघांचेही अभिनंदन केले. त्यानंतर संपूर्ण शहरात विजयी रॅली काढण्यात आली.

संजय देरकर यांनी पोस्टल व्होट पासूनच आघाडी घेतली. पोस्टल मतदानात त्यांना 959 तर बोदकुरवार यांना 495 मते मिळाली. त्यानंतर ईव्हीएमच्या पहिल्या फेरीपासूनच त्यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. ही आघाडी आधी 4 ते 6 हजारांची होती. 11 व्या फेरीत ही लीड फक्त 1912 मतांवर आली. त्यामुळे आता निवडणूक रंगतदार होणार अशी शक्यता निर्माण झाली. मात्र त्यानंतर देरकर यांनी पुन्हा मुसंडी मारली. त्यांची दर फेरीतील लीड वाढतच गेली.  19 व्या फेरीत ही लीड वाढत 10 हजारंच्या वर गेली. त्यानंतर 23 व्या फेरी पर्यंत ही लीड 12 हजारांच्या वर गेली. तर अखेरच्या दोन फेरीत ही लीड 15 हजारांच्या वर गेली. अखेर संजय देरकर यांनी 15.560 मतांनी बोदकुरवार यांच्यावर विजय मिळवला. तिस-या क्रमांकावर मनसे राहिली. तर चौथ्या क्रमांकावर संजय खाडे राहिले. 

4 उमेदवारांना नोटापेक्षा कमी मत
विशेष म्हणजे या निवडणुकीत 4 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मते मिळाली. यात एक राष्ट्रीय पक्षाचा तर इतर अपक्ष उमेदवार आहेत. बसपाचे उमेदवार अरुणकुमार खैरे, हरीष पाते, नारायण गोडे व केतन पारखी यांना नोटा पेक्षाही कमी मते मिळाली. यावेळी नोटाला 1328 मते मिळाली तर खैरे यांना 1154, हरीष पाते यांना 1306 मते मिळाली. नारायण गोडे व केतन पारखी यांना 1 हजारांचा पल्ला देखील गाठता आला नाही. 3868 मते घेत पाचव्या क्रमांकावर भाकपचे अनिल हेपट राहिले तर सहाव्या क्रमांकावर  3559 मतं घेत वंचितचे राजेंद्र निमसटकर राहिले.

 25 वर्षानंतर झाले आमदाराकीचे स्वप्न पूर्ण
संजय देरकर यांनी सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे 1999 मध्ये निवडणूक लढली. त्यानंतर दोन तुल्यबळ कुणबी उमेदवारांमुळे मतविभाजनाचा फटका बसतो व काँग्रेस विजयी होते. त्यामुळे 2004 मध्ये त्यांनी माघार घेतली. 2009 मध्ये त्यांनी अपक्ष उभे राहत तब्बल 41 हजारांपेक्षा अधिक मते मिळवली. तर 2019 मध्ये त्यांना अपक्ष उभे राहत 25 हजारांपेक्षा अघित मते मिळाली. मात्र यावेळी त्यांनी विजयश्री घेचून आणली. यावेळी त्यांना महाविकास आघाडी, कम्युनिस्ट व संभाजी ब्रिगेड यांची चांगली साथ मिळाली.

पाहा कुणाला कोणत्या फेरीत किती मते मिळाली…

कधी देरकर तर कधी बोदकुरवार यांची आघाडी.. पाहा लाईव्ह रिझल्ट

Comments are closed.