संजय खाडेंची लढण्याची घोषणा… पत्रकार परिषदेत खाडे यांना अश्रू अनावर

नाईलाजास्तव निवडणूक लढण्याचा निर्णय - संजय खाडे

निकेश जिलठे, वणी: वणी विधानसभा मतदारसंघ हा कायमच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र काही कारणास्तव हा मतदारसंघ शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वाटेला गेला. परिणामी काँग्रेस पक्षात नाराजी वाढली. त्यामुळे नाईलाजास्तव व कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी मला निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घ्यावा लागला. माझ्या उमेदावारीला काँग्रेस तसेच शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांचेही समर्थन आहे. त्यामुळे ही निवडणूक जोमाने लढणार व विजयी होणार, असा विश्वास संजय खाडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. आज दु. 3.30 वाजता वणीतील वसंत जिनिंगमध्ये संजय खाडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेत उपस्थित शिवसेना व काँग्रेसच्या नेत्यांमुळे महाविकास आघाडीत वणी विधानसभा क्षेत्रात उभी फूट पडल्याचे दिसून आले. मंगळवारी स. 10 वाजता संजय खाडे हे श्री. रंगनाथ स्वामी मंदिर येथे प्रचाराचे नारळ फोडणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.

संजय खाडे यांना अश्रू अनावर
पत्रकार परिषदेत बोलताना खाडे भावूक झाले. पक्षासाठी रक्ताचे पाणी केले. पक्ष वाढवण्यासाठी दिवसरात्र एक करीत परिश्रम घेतले. सर्वसामान्य जनतेसाठी वेळोवेळी आवाज उठवला. सर्वसामान्यांसाठी सत्ताधा-यांविरोधात दंड थोपटले. काँग्रेस माझ्या रक्तात आहे. हा निर्णय मला नाईलाजास्तव घ्यावा लागत आहे, असे म्हणत ते भावूक झालेत व त्यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान त्यांनी या निवडणुकीत मास्टरस्ट्रोक ठरलेल्या जनहित केंद्राचा देखील उल्लेख केला. आमदार झाल्यास जनहित केंद्र नेहमीसाठी सुरु राहणार, असे वचन त्यांनी यावेळी दिले. सर्वसामान्य जनतेने या निवडणुकीत सहकार्य करावे, असे आर्जव त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेला केले.

आपली भूमिका स्पष्ट करताना विश्वास नांदेकर म्हणाले की एक शिवसैनिक म्हणून मी राजकारण सुरु केले व आजही मी एक शिवसैनिकच आहे. गेल्या 30 वर्षांपासून मी राजकारणात आहे. राजकारणात असताना पदाची कधीही चिंता केली नाही. सोबत राहून पोटात खंजर खुपसण्याचे काम मी करीत नाही. या लढाईत माझ्यासोबत वणी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे तिन्ही तालुका प्रमुख आहेत. यासह अनेक शिवसैनिक सोबत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी बोलताना नरेंद्र ठाकरे म्हणाले की संजय खाडे यांनी काँग्रेस पक्षासाठी कायम निष्ठेने काम केले. निष्ठेने काम करणा-यांच्या मी कायम सोबत राहिलो आहे. एकिकडे निष्क्रिय माणूस आहे तर दुसरीकडे सक्रिय माणूस आहे. त्यामुळे संजय खाडे यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचे ठाकरे म्हणाले.

महाविकास आघाडीत उभी फूट
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, मारेगाव तालुका अध्यक्ष संजय आवारी, झरी तालुका अध्यक्ष चंद्रकांत घुगुल काँग्रेसचे नरेंद्र ठाकरे, पुरुषोत्तम आवारी, शंकर व-हाटे, तेजराज बोढे, पलाष बोढे, गौरीशंकर खुराणा यांच्यासह सुनील वरारकर, प्रशांत गोहोकार, पवन शाम एकरे यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. याशिवाय काँग्रेसचे अनेक नेते हे संजय खाडे यांच्या संपर्कात असून लवकरच ते संजय खाडे यांना आपला पाठिंबा जाहीर करणार व काही नेते छुप्या पद्धतीने मदत करणार असल्याची माहिती ‘वणी बहुगुणी’ला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

 

पत्रकार परिषदेला विश्वास नांदेकर, नरेंद्र ठाकरे, गौरीशंकर खुराणा, सुनील वरारकर, शंकर व-हाटे, पुरुषोत्तम आवारी, तेजराज बोढे, प्रशांत गोहोकार, पवन ऐकरे, संजय आवारी, ऍड. सूरज महातळे यांच्यासह संजय खाडे यांचे समर्थक उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.